पुण्यातील कल्याणीनगर येथे इमारतीच काम सुरू होते. दरम्यान अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने एक मजूर त्याखाली दबल्या गेला होता. त्या मजुराला तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

अग्निशामक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर येथील सुग्रा टेरेस येथे इमारतीच्या नूतनीकरणाचे काम दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सुरु होते. तेव्हा तिथे ७ ते ८ मजुर काम करीत होते. काही समजण्याच्या आत अचानक मातीचा ढिगारा कोसळला. तेवढ्यात सर्व मजूर पळत सुटले. पण त्यांच्यापैकी एकजण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेला.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक विभागाच्या अधिकारी काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू केले. माती बाजूला करायला तब्बल दोन तास लागले. त्यानंतर त्या मजुराला रुग्णवाहिकेतून रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची तब्येत चांगली चांगली आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.