पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचारावरून भाजप-राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांमध्ये सुरू असलेले आराेप-प्रत्याराेप म्हणजे ‘नुरा कुस्ती’ आहे. जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी हे आराेप सुरू आहेत. भाजपचे आमदार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भ्रष्टाचाराचे ‘आका’ म्हणतात, मात्र या ‘आकांना’ त्यांच्याच नेत्यांनी मांडीवर घेतल्याची टीका शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली. 

प्रभाग क्रमांक २५ पुनावळे-ताथवडे मधील शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अंधारे आल्या हाेत्या. या वेळी त्या बोलत होत्या. जिल्हाप्रमुख, माजी आमदार गाैतम चाबुकस्वार, निवडणूक प्रभारी अशाेक वाळके, उपजिल्हा प्रमुख राेमी संधू, कैलास नेवासकर या वेळी उपस्थित हाेते.

‘पिंपरी-चिंचवड महापालिका ही कुबेराची खाण आहे. त्यामुळे सत्तेतीमधील दाेन पक्ष भांडत आहे. आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका कर्जबाजारी झाल्याचा’ आराेप करत अंधारे पुढे म्हणाल्या, ‘स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुणे, पिंपरी-चिंचवड शहराची वाट लावली आहे. पुनावळे, ताथवडे भागातील नागरिक आजही मुलभूत सुविधासाठी झगडत आहेत. असे असताना शहरातील प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आराेप-प्रत्याराेप करून नुरा कुस्ती खेळत आहेत. शिवसेनेच्या उमेदवारांना धमक्या देऊन निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडले. आता उमेदवारांना धमकावून, घाबरवून प्रचार यंत्रणा राबवू दिली जात’ नसल्याचा आराेप अंधारे यांनी केला.  

मतदान यंत्रावरील मशाल ओळखता येत नाही

शिवसेना पक्षाचे मशाल चिन्ह मतदान यंत्रावर (ईव्हीएम)वर ओळखता येत नाही. याबाबत आम्ही निवडणूक विभागाला लेखी पत्र देऊन आक्षेप नाेंदविला आहे. मतदान यंत्रावर मशाल चिन्ह व्यवस्थित छापण्याची मागणी केली आहे. मात्र, आयोगाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नगरपरिषद निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीत पैशांचा वारेमाफ वापर सुरू असून आयाेगाचे अधिकारी डाेळेझाक करत असल्याचा आराेप अंधारे यांनी केला. 

भाजप काॅंग्रेसयुक्त पार्टी

देवेंद्र फडणवीस २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाले आणि राज्याच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास हाेण्यास सुरूवात झाली. फडणवीस हे मानसिकदृष्ट्या असुरक्षित असलेली व्यक्ती आहे. त्यामुळे ते जास्त आक्रमक हाेतात, भ्रष्टाचारावर टीका करून इतर पक्षातील सगळे भ्रष्टाचारी भाजपमध्ये घेऊन त्यांच्याच मांडीला माडी लावून बसायचे, हा फडणवीस यांचा ढाेंगीपणा असल्याची टीका अंधारे यांनी केली.

भाजपला प्रभू श्रीरामांचे नाव घेण्याचा अधिकार नाही

सत्तेसाठी भाजप-काॅंग्रेस-एमआयएम पक्षाबराेबर गेला आहे. त्यामुळे भाजपला प्रभू श्रीरामांचे नाव घेण्याचा अधिकारच राहिला नाही. भाजप हा गुन्हेगारांना आश्रय देणारा पक्ष झाला असून दहशतीच्या जाेरावर बिनविराेध नगरसेवक निवडून आणले जात आहे, असा आरोप अंधारे यांनी केला.