पुणे : परवाना मिळण्यापूर्वीच ऊस गाळप सुरू केल्याप्रकरणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याला अकरा कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. साखर आयुक्त डाॅ. संजय कोलते यांनी त्याबाबतचे आदेश दिले आहेत. सात दिवसाच्या आत दंडाची रक्कम भरण्यात यावी, असे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, पंढरपूर येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याला २ कोटी ३२ लाख रुपयांचा आणि सांगली जिल्ह्यातील रायगाव शुगर अँड पावर या खासगी कारखान्याला सुमारे चाळीस लाख रुपयांचा दंड ठोठाविण्यात आल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली.
राज्यात ऊस गाळपाला राज्यात १ नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली. ऊस गाळप करण्यासाठी साखर उत्पादकांना साखर आयुक्तालयाकडून गाळप परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार गाळप परवाना मागणीचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करून गाळप परवाना घेण्याबाबत साखर आयुक्तालयाकडून कारखान्यांना कळविण्यात आले होते. इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर येथील शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने २० ऑक्टोबर रोजी प्रादेशिक सहसंचालकांकडे ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, परवाना मिळण्याआधीच गाळप सुरू केले होते. त्यामुळे या कारखान्याला पाचशे रुपये प्रति टन या प्रमाणे ११ कोटी २१ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. या कारखान्याने २ कोटी २४ लाख २९९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याने गाळप परवाना प्रस्ताव प्रादेशिक सहसंचालक (साखर), सोलापूर यांच्या मार्फत २९ सप्टेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने पाठवला होता. मात्र, कारखान्याने परवाना मिळण्याआधीच ४६ हजार ४४७ मेट्रिक टन उसाचे गाळप केल्याने कारखान्याला २ कोटी ३२ लाख २३ हजार ५०० रुपये दंड ठोठाविण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील रायगाव शुगर अँड पावर या खासगी कारखान्याने विना परवाना ७ हजार ९८० मेट्रिक टन उसाचे गाळप केल्याप्रकरणी ३९ लाख ९० हजार ३८० रुपयांचा दंड ठोठाविण्यात आल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली.
दरम्यान, परवाना मिळण्याआधीच शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पुरवठा केला असेल तर त्यांना एफआरपी देण्याबाबत नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत बुडण्याची शक्यता आहे.
