पुणे : साखरेच्या उत्पादनात झालेली घट, तसेच वाढत्या मागणीमुळे गेल्या महिन्याभरात साखरेच्या दरात किलोमागे सहा ते सात रुपयांची वाढ झाली आहे. सणासुदीच्या तोंडावर साखर महाग होणार असल्याने सामान्यांना दरवाढीची झळ पोहोचणार आहे. किरकोळ बाजारात एक किलो साखरेला ५२ ते ५३ रुपये भाव मिळाला आहे. सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

केंद्र शासनाने ऑगस्ट महिन्याचा साखरेचा कोटा नुकताच जाहीर केला. साडेबावीस लाख टन एवढा कोटा ऑगस्ट महिन्यासाठी जाहीर करण्यात आला आहे. जुलै महिन्यात साखरेच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. साधारणपणे क्विंटलमागे ६०० रुपयांनी वाढ झाली. श्रावण मास, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, तसेच दिवाळीत साखरेच्या मागणीत वाढ होते. किरकोळ ग्राहकांसह मिठाई विक्रेत्यांकडून साखरेच्या मागणीत मोठी वाढ होते.

‘गेल्या हंगामात साखर उत्पादनात घट झाली. घाऊक आणि किरकोळ बाजारातील मागणी विचारात घेता सध्या बाजारात होत असलेली साखरेची आवक अपुरी आहे. साखर कारखानदारांकडे साखरेचा साठा कमी आहे. व्यापारी साखरेची साठवणूक करू शकत नाहीत. तेवढी जागाही व्यापाऱ्यांकडे उपलब्ध नाही. मागणीच्या तुलनेत साखरेची आवक कमी होत असल्याने दरवाढ झाली आहे,’ असे मार्केट यार्ड भुसार बाजारातील साखर व्यापारी, मोतीलाल अँड सन्स पेढीचे संचालक ईश्वर नहार यांनी नमूद केले.

मार्केट यार्डातील घाऊक बाजारात सोमवारी प्रतिक्विंटल साखरेला ४९०० ते ५१०० रुपये असा भाव मिळाला. घाऊक बाजारातील भाव तेजीत असल्याने किरकोळ बाजारातील दरवाढ अपरिहार्य आहे. किरकोळ बाजारात साखरेचा भाव ५२ ते ५३ रुपये किलो आहे, असे सांगण्यात आले.

बाजारात सध्या चांगल्या प्रतीची साखर उपलब्ध नाही. चांगल्या प्रतीच्या साखरेचे भाव जास्त आहेत. साखर हंगाम सुरू होण्यासाठी तीन महिने लागणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस नवीन हंगाम सुरू होईल. त्यानंतर साखरेचा भाव कमी होईल. आगामी सणासुदीच्या काळात साखरेचे दर तेजीत राहणार आहेत. – ईश्वर नहार, साखर व्यापारी, मार्केट यार्ड भुसार बाजार

पाऊस लांबल्याने ऊस लागवडीवर परिणाम झाला. ऊस लागवडीस वेळ लागणार असल्याने साखर कारखाने उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाने उपलब्ध असलेला साखरेचा साठा विचारात घेणे गरजेचे आहे. सणासुदीच्या काळात मागणीच्या तुलनेत साखरेची आवक कमी होणार असून, भावही तेजीत राहणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साखरेचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. – मुकेश गोयल, साखर व्यापारी, मार्केट यार्ड, भुसार बाजार