पिंपरी-चिंचवडमध्ये योगा प्रशिक्षक असलेल्या विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. दरम्यान, मयत महिलेने अगोदर ब्लेड ने नस कापून आयुष्य संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विशाखा सोनकांबळे अस आत्महत्या केलेल्या योगा शिक्षिकेचे नाव आहे. 

विशाखा यांनी आत्महत्या करण्याच्या अगोदर एका डायरीत आपला आठवणींना उजाळा देत नवऱ्याबद्दल तक्रारी केल्या आहेत. मात्र, आत्महत्येस पती जबाबदार नाही अस देखील म्हटलं आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत योगा प्रशिक्षक असलेल्या विशाखा यांनी आत्महत्या केली आहे. रविवारी पती आणि दोन मूल हे हॉलमध्ये झोपले होते. तर, विशाखा या बेडरूमध्ये झोपल्या होत्या. मध्यरात्री त्यांनी हाताची ब्लेड ने नस कापून आयुष्य संपविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यानंतर विशाखा यांनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती पतीने स्वतः पोलिसांना फोन करून दिली आहे. दरम्यान, विशाखा यांनी छोट्या डायरीत सात-आठ पानांमध्ये आयुष्यातील काही घटना लिहिल्या आहेत. त्यात त्यांनी मुलांविषयी, पती विषयी लिहिलं असून पतीसोबत पटत नसल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, आत्महत्येस पती जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे. घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.