पुण्यातील धनकवडी भागात राहणार्‍या ग्रामीण पोलिस विभागातील एका महिला पोलीस कर्मचार्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पूजा दत्तात्रय कांबळे (२९) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलिसाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण मधील दौंड पोलीस स्टेशनमध्ये कॉन्टेबल म्हणून पूजा कांबळे या कार्यरत होत्या. त्या प्रसूती रजेवर असल्याने,धनकवडी परिसरात त्या कुटुंबासह राहण्यास होत्या. पूजा यांना ८ महिन्याच बाळ होते. त्याचा जन्म तारखेनुसार रविवारी वाढदिवस होता. त्यासाठी पूजा आणि त्यांचे पती दोघांनी सायंकाळच्या सुमारास वाढदिवसासाठी मुलासाठी कपडे आणि इतर साहित्य घेऊन आले. काही वेळाने त्यांनी कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला. त्यानंतर सर्व आवरून झाल्यावर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पूजा दुसर्‍या मजल्यावरील खोलीमध्ये गेल्या.

बराच वेळ झाला तरी त्या खाली न आल्याने पतीने वर जाऊन दरवाजा वाजवला आणि त्यांना आवाज दिला. आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने पतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर पूजा यांनी गळफास घेतल्याचे दिसले. पूजाला तातडीने जवळील रूग्णालयात दाखल केले असता,डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेबाबत कुटुंबियांकडे चौकशी करण्यात येत असल्याचे सहकारनगर पोलिसांनी सांगितले.