विवाहित असताना तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक केल्याने तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात घडली. या प्रकरणी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) एका जवानाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी गुरिंदर सिंग (वय ३५ रा. एनडीए क्वार्टर, खडकवासला) याला अटक करण्यात आली. याबाबत तरुणीच्या भावाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी गुरिंदर सिंग विवाहित होता. तो लष्करात जवान असून त्याची नियुक्ती राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत करण्यात आली आहे. हेही वाचा >>>VIDEO : “जमिनीशी नाळ असलेलं राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपलं”, गिरीश बापट यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली! सिंग एनडीएच्या वसाहतीत राहायला आहे. उत्तमनगर भागातील २१ वर्षीय तरुणीची सिंग याच्याशी ओळख झाली होती. त्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तिला विवाहाचे आमिष दाखविले होते. तरुणीने त्याला विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने राहत्या घरात प्रसाधनगृहात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.तरुणीच्या भावाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर सिंग याला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक ए. एस. चवरे तपास करत आहेत.