स्त्रीमध्ये केवळ सहन करण्याची ताकद असते असे नाही, तर संकटाला सामोरे जाण्याची तिची तयारी असते. प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या अशा सामथ्र्यशाली मातृशक्तीचा गौरव सदोदित झाला पाहिजे, अशी अपेक्षा लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी मंगळवारी व्यक्त केली.
आदित्य प्रतिष्ठानच्या ३२ व्या वर्धापनदिनानिमित्त सुमित्रा महाजन यांच्या हस्ते किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे, सामाजिक कार्यकर्त्यां सिंधूताई सपकाळ, विज्ञानलेखिका डॉ. रोहिणी गोडबोले आणि प्रतिभा इंडस्ट्रीजच्या उषा कुलकर्णी यांना ‘लक्ष्मी-वासुदेव स्त्रीशक्ती गौेरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. प्रत्येकी २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. खासदार अनिल शिरोळे, ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर आणि अपर्णा अभ्यंकर या वेळी व्यासपीठावर होत्या.
जीवनामध्ये संस्कारांचे महत्त्व कमी होत आहे. आम्हाला जीवनाचे ‘पॅकेज’ समजत नाही. पण, चांगले पॅकेज मिळावे यासाठी शिक्षण घेतले पाहिजे ही धारणा वाढत आहे. पृथ्वीला माता मानून आणि देशाचा ‘भारतमाता’ असा गौरव करून पूजन करण्याची आपली संस्कृती आहे. याविषयी भारताबद्दल जगामध्ये अभिमान आहे. मात्र, संस्कृतीचा हा मूलभूत पाया आम्ही विसरत चाललो आहे, याकडे सुमित्रा महाजन यांनी लक्ष वेधले. एकटा पती नाही, तर बरोबरीने पत्नी सामर्थ्यांने उभी रहाते तेव्हा लक्ष्मी-नारायणाचा जोडा काही विधायक कार्य करू शकतो अशा शब्दांत अभ्यंकर दाम्पत्याच्या कार्याचा गौरव करून, संतविद्यापीठ व्हावे ही भारताची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
संगीत आणि नृत्य या कलांचे सौंदर्य वाढविण्यामध्ये आणि आशय समृद्ध करण्यामध्ये स्त्रियांचे मोठे योगदान असल्याचे सांगून डॉ. प्रभा अत्रे म्हणाल्या, ‘‘साधनेच्या वाटचालीत असे आनंदाचे क्षण येतात तेव्हा अलिप्त राहून मी कामाकडे पाहते. मात्र, हा पुरस्कार संगीत कलेबरोबरच स्त्रीशक्ती म्हणून मिळाल्याने आनंद झाला आहे.’’
डॉ. रोहिणी गोडबोले, सिंधूताई सपकाळ, उषा कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. शंकर अभ्यंकर यांनी प्रास्ताविकामध्ये प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली.