पुणे : उन्हाळा सुरू झाला असून, हवेतील उष्मा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हवामानातील या बदलामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, ताप आणि खोकल्याच्या तक्रारी जास्त दिसून येत आहेत. याचवेळी उलट्या आणि जुलाबाचे रुग्णही काही प्रमाणात आढळून येत आहेत. रुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यतज्ज्ञांनी उन्हाळ्यात नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याचा सल्ला दिला आहे.

सध्या पहाटे गारवा आणि दिवसभर उष्मा असे हवामान आहे. या हवामानामुळे विषाणूजन्य रोगांचा संसर्ग वाढला आहे. फ्ल्यूचे रुग्ण अधिक दिसून येत आहे. सर्दी, खोकला आणि ताप अशी लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येत आहेत. याचवेळी बाहेरील खाद्यपदार्थ आणि शीतपेयांमुळेही नागरिक आजारी पडत आहेत. त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत आहे. रस्त्यावरील खापदार्थ बनविताना स्वच्छता पाळली जात नाही. तसेच, शीतपेयांमध्ये वापरला जाणारा बर्फही चांगला नसतो. त्यामुळे नागरिकांनी बाहेरील खाद्यपदार्थ आणि शीतपेये टाळावीत, असे आरोग्यतज्ज्ञांनी म्हटले आहे.

लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असून, याबाबत बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप सारडा म्हणाले की, विषाणूजन्य आजार लहान मुलांमध्ये अधिक दिसून येत आहेत. सर्दी, ताप आणि खोकला अशी लक्षणे दिसून येत आहेत. फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. एकदा फ्ल्यूची लस दिली की, पुन्हा देण्याची आवश्यकता नाही, असा पालकांचा समज असून, तो चुकीचा आहे. त्यामुळे लहान मुलांना दरवर्षी न चुकता फ्ल्यूची लस द्यावी. मुले आजारी पडल्यास त्यांना शाळेत पाठवू नका. मुलांच्या स्वच्छतेच्या सवयींकडे बारकाईने लक्ष द्यावे. याचबरोबर मुलांना जंक फूड खाण्यास देऊ नये. त्यांना सकस आणि संतुलित आहार द्यावा.

उन्हाळ्यात शरीरावर अनेक परिणाम होतात. त्यामुळे त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारे शरीराची काळजी घेणे आवश्यक ठरते. उन्हाळ्यात सूर्याच्या अतिनील किरणांची तीव्रता वाढत असल्याने त्वचेचे संरक्षण होईल, याची काळजी घ्यावी. दिवसा बाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करावा. उन्हामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. तीव्र उन्हामुळे उष्माघाताचा धोका असतो. शरीरातील पाणी पातळी भरून काढण्यासाठी जास्त पाणी प्यावे. शरीरातील पाणी कमी होण्याचे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. मुतखड्यापासून अनेक मूत्रविकार यामुळे होतात. रस्त्यांवरील फळांचा रस अथवा शीतपेये टाळावीत. कारण त्यात जास्त साखर असते. त्याऐवजी घर बनविलेले लिंबू सरबत प्यावे, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिला.