शाळांना उद्यापासून (१ मे) उन्हाळी सुटी लागत आहे. सुटीच्या काळात मुलांचा वेळ सत्कारणी कसा लावावा, असा प्रश्न पालकांना पडतो. अशा पालकांसाठी आणि आता काय करू, असा प्रश्न पडणाऱ्या मुलांसाठी मनोरंजनाबरोबरच अभ्यासही करता येईल, अशा एका उपक्रमाबद्दल ग. रा. पालकर शाळेतील शिक्षिका मानसी योगेश कुलकर्णी यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.
अभ्यासनाट्य लेखन, सादरीकरण हा प्रवास कसा होता?
– माझ्या या अभ्यासनाट्य प्रवासाचा प्रारंभ २४ जुलै २०१० ला झाला. यात माझी शाळा, माझे सहकारी आणि विद्यार्थी यांचा मोलाचा वाटा आहे. मला ‘नाट्यसंस्कार कला अकादमी’कडून आयोजित अभ्यासनाट्याच्या कार्यशाळेला जाण्याची संधी मिळाली आणि तेव्हापासून सुरू झालेल्या १६ वर्षांच्या माझ्या या प्रवासात मी अनेक अभ्यासनाट्ये लिहिली, सादर केली आणि दर वर्षी बक्षिसेही पटकाविली.
कार्यशाळेच्या अनुभवाबद्दल काही सांगा…
– कार्यशाळेत ‘नाट्यसंस्कार’चे संस्थापक आणि प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी अभ्यासनाट्य संकल्पनेची सविस्तर ओळख करून दिली. अभ्यास विषयाच्या एखाद्या धड्याचे नाटकात रूपांतर करायचे, अभ्यासातील संकल्पना, त्यातील घटक या जणू जिवंत व्यक्तिरेखा कशा करायच्या, ते अभ्यासनाट्य कंटाळवाणे न होता कसे फुलवायचे या विषयी सविस्तर सांगितले. या स्पर्धेसाठी शिक्षकांनी स्वतः विषय आणि धडा निवडायचा आणि नाटकाची संहिता लिहायची ही कल्पनाच माझ्यासाठी वेगळी होती. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची उपजत आवड असणाऱ्या माझ्यामध्ये या कार्यशाळेनंतर अभ्यासनाट्याचे बीज रुजले.
नाटकात अभ्यास आणणे ही प्रक्रिया कशी होती?
– अभ्यासनाट्याचे बीज अंकुरायला लागले आणि मग काय! ‘चला, आता आपणपण नाटक लिहूयात,’ असा नुसता विचार न करता अभ्यासनाट्यासाठी लेखणी हाती धरली. मी विज्ञान, भूमिती, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र अशा विषयांवर नाटिका लिहिल्या. सुरुवातीला मी सहावी आणि सातवीच्या अभ्यासक्रमातील दोन अभ्यासनाट्ये लिहिली. त्यानंतर अर्थातच मुलांची निवड, अभ्यासनाट्याचा सराव, मुलांकडून पाठांतर करून घेणे, नाट्याचे दिग्दर्शन करणे असे सुरू झाले. स्पर्धेचा दिवस उजाडला आणि दोन्ही अभ्यासनाट्ये परीक्षकांना भावली. पहिल्यांदा अभ्यासनाट्य स्पर्धेत भाग घेत असताना आम्हाला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. दुसऱ्या वर्षी सांघिक उत्तेजनार्थ, तर मला सर्वोत्कृष्ट संहितेसाठी पारितोषिक प्राप्त झाले. करोनाची तीन वर्षे वगळता गेल्या १५ वर्षांत २० अभ्यासनाट्ये मी लिहिली. लेखनात विविध प्रयोग करत राहिले. अभ्यास आणि मनोरंजन दोन्ही तेवढ्याच तोलामोलाचे झाले पाहिजे, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.
स्पर्धेत सहभागी होत राहिल्याने मुलांच्या वर्तणुकीत काही फरक पडला का?
– हो, नक्कीच! नाट्यसादरीकरणामुळे मुलांचा आत्मविश्वास दुणावला. एकमेकांना मदत करण्याची वृत्ती वाढली. जो विद्यार्थी ज्या कलेमध्ये चांगला आहे, ती कला नाटकात त्याला हाताळता आली. चित्र, नृत्य, शिल्पकाम, कागदकाम आदींचा वापर करून नेपथ्य साकारले गेले. नाट्याला संगीत दिले गेले. मुलांमधील उपजत कलागुण व्यक्त करण्याचे व्यासपीठ यानिमित्ताने त्यांना सहजच मिळाले. त्याबरोबरच त्यांना पाठांतराची सवयही लागली. समयसूचकता आणि उच्चारात शुद्धता हेदेखील अभ्यासनाट्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये येत गेले. अभ्यासात तरबेज नसलेले एखादे मूल या नाटकात मात्र चमकू लागले. पारखी सरांमुळे हे साध्य होऊ शकले. त्यांना माझे लेखन आवडले होते. त्यामुळे ‘नाट्यसंस्कार’चे अभ्यासनाट्यावरचे पहिलेच आणि माझ्या बक्षीसपात्र अभ्यासनाट्याचेही पहिलेच पुस्तक या वर्षी प्रकाशित झाले. उन्हाळी सुटीतला वेळ अभ्यासनाट्यासारख्या उपक्रमाद्वारे छान जाईल आणि काही तरी उपयुक्तही हाताशी लागेल, याची मला खात्री आहे.
shriram.oak@expressindia.com
