पुणे : नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील सन सिटी भागाला कर्वेनगरशी जोडणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हा पूल वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर या भागात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिकेने विकास आराखड्यातील (डीपी) रस्त्याच्या भूसंपादनाला वेग दिला आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जागा महापालिकेच्या ताब्यात येईल आणि त्यानंतर लगेच प्रत्यक्ष रस्ता विस्तारीकरणाचे काम सुरू केले जाईल, असे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले.

महापालिकेच्या शिवणे-खराडी प्रकल्पांतर्गत कर्वेनगर भागातील महालक्ष्मी लॉन्स ते दुधाने लॉन्स (जावळकर उद्यान) दरम्यानचा ३६ मीटर रुंदीचा डीपी रस्ता आणि कर्वेनगर आंबेडकर चौक ते जावळकर उद्यान दरम्यानच्या ३० मीटर डीपी रस्त्याचे भूसंपादन रखडले आहे. यासाठी सुमारे ९० कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. हे काम मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातदेखील याबाबत बैठक झाली होती.

या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली पथ विभाग, भूसंपादन विभाग आणि मालमत्ता व व्यवस्थापन विभागाची संयुक्त बैठक पार झाली. पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर, भूसंपादन व व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त निखिल मोरे, मालमत्ता विभागाचे उपायुक्त प्रशांत ठोंबरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या भागातील भूसंपादन करण्यासाठी महापालिकेला ९० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी ३० टक्के रक्कम २७ कोटी १४ लाख रुपये महापालिकेने विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांकडे जमा केले आहेत. पुढील आठवड्यात कलम १९ ची अधिसूचना जाहीर होऊन अंतिम निवाड्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती दिवटे यांनी दिली. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत ही जागा पालिकेच्या ताब्यात येईल आणि त्यानंतर लगेचच प्रत्यक्ष रस्ता विस्तारीकरणाचे काम सुरू केले जाईल, असे अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी सांगितले.

सन सिटी-कर्वेनगर पूल तसेच विकास आराखड्यातील रस्ते वाहतुकीसाठी खुले झाल्यानंतर सिंहगड रस्त्यावरून कर्वेनगर व वारजे भागात जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या वाहनचालकांना राजाराम पुलावरून वळसा घालून प्रवास करावा लागतो. या नव्या मार्गामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचेल आणि वाहतूक कोंडीही कमी होईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.