पुणे : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि काँग्रेसचे आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असताना, ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महायुतीतील नेते कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंंदे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्यावेळी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घ्यावी, यासाठी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात असल्याबाबत सुनील तटकरे म्हणाले, ‘सर्वच पक्षांना ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आवाहन केले आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत सर्वांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. निवडणूक लादली गेली तर बारामतीकरांना विनंती आहे की, देशाच्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी विजय झाला नसेल तितक्या विक्रमी मतांनी सुनेत्रा पवार यांना निवडून द्यावे.’

‘ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करत आहोत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे.’ असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची इच्छा आहे. अन्य पक्षांनीही तेच करावे. दु:खद घटना घडल्यास निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा इतर पक्षांनीही पुढे न्यावी.’

बावनकुळे म्हणाले,‘काँग्रेसने निवडणूक लढवू नये, ही जनभावना आहे. काँग्रेसने महाराष्ट्राचे संस्कार जपले पाहिजेत. अजित पवार यांचा जीवन प्रवास काँग्रेसबरोबर राहिला आहे. त्यामुळे बारामतीमध्ये काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवू नये, अशी विनंती आहे. काँग्रेसला संस्कार आणि संस्कृती राहिली नसेल, तर त्यांनी लढावे.’

पार्थ पवार यांच्याकडून संताप

काँग्रेसने उमेदवार उभा केल्याने युवा नेते पार्थ पवार यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ‘कोणाबरोबर बोलणे झालेले नाही. काय करायचे, ते त्यांना कळायला हवे. ते काय करत आहेत, ते सगळ्यांना माहीत आहे. सगळे मोठे लोक आहेत, सगळ्यांना समजते की काय चालले आहे. त्यांना काय करायचे ते करू द्या; पण नंतर काय त्रास होईल ते महाराष्ट्रात दिसेल.’

सुनेत्रा पवार यांचे भावनिक आवाहन

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना भावनिक आवाहन केले. त्या म्हणाल्या, ‘अजित पवार यांचा बारामती हा श्वास होता. त्यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, मात्र, त्यांचा विकासाचा वारसा मी पुढे नेईन. ही निवडणूक माझी नसून बारामतीकरांची आहे. दादांपेक्षा काकणभर जास्त साथ द्या. चार वेळा मुख्यमंत्री झालेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मी सून, तर सहा वेळा उपमुख्यमंत्री झालेल्या अजितदादांची मी पत्नी आहे. गेली ४० वर्षे मी पवार परिवाराची काळजी घेतली. आता बारामतीसह राज्याच्या जनतेची काळजी घेण्याची ताकद मला मिळावी.’