बारामती : ‘राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पुष्पगुच्छ आणि सत्कार स्वीकारू नयेत. त्याऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत द्यावी,’ असे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. बारामतीत राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन येथे झालेल्या बारामती सहकारी बँकेच्या ६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, ‘राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सत्कार स्वीकारू नयेत. सत्कार आणि पुष्पगुच्छासाठी खर्च करण्यापेक्षा मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदतीचा हात पुढे करावा. तसेच पाण्याचा जपून वापर करावा.’

बारामती सहकारी बँकेचा राज्यभर विस्तार करून आधुनिक स्वरूप देण्याची गरज असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, ‘बँकेने सभासदांचा विश्वास जपत उद्योगधंदे, शेतकरी आणि तरुणांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. सहकारी संस्थांच्या यशामध्ये सभासद आणि संचालकांचा महत्त्वाचा वाटा असतो. बँकेच्या वाढत्या डिजिटल व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षा अधिक मजबूत करणे आवश्यक आहे.’

‘बँकेला अजित पवार यांनी लावलेली आर्थिक शिस्त सर्वांनी जपली पाहिजे. बारामती सहकारी बँक ही केवळ एक बँक नाही, तर बारामतीकरांचा विश्वास आहे. काळ कोणासाठीही थांबत नाही. सर्वांनी अजित पवार यांनी घालून दिलेला वारसा आणि विचार पुढे न्यावा,’ असे आवाहनही त्यांनी केले.

अजित पवार यांच्या आठवणीने भावुक

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयीच्या आठवणीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या भावुक झाल्या. ‘बँकेच्या सर्वसाधारण सभेला अजित पवार यांच्याबरोबर या, असे सगळे अनेक वर्षांपासून म्हणायचे. मात्र, सभेला मला एकटीला यावे लागेल, असे कधी वाटले नव्हते.’