दीपक पडकर
बारामती : ‘राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी उमेदवाराची निवड करणे ही पक्षांतर्गत बाब आहे. सर्वांची मते जाणून घेऊन येत्या दोन दिवसांत उमेदवाराचे नाव निश्चित केले जाणार आहे,’ असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.बारामती येथे वादळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली. तसेच मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. याबाबत त्या म्हणाल्या, ‘उमेदवाराची निवड करणे ही पक्षांतर्गत बाब आहे. सर्व बाबींचा सारासार विचार करून आणि सर्वांची मते जाणून दोन दिवसांत उमेदवार निश्चित केला जाणार आहे.’
बारामती शहर आणि परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे शेतीसह मालमत्तेचे नुकसान झाले आहे. याबाबत त्या म्हणाल्या, ‘बारामती शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे ४०० मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. ग्रामीण भागात पिकांचे नुकसान झाले आहे. कराटी आणि काटेफळ यांसारख्या गावांमध्ये केळी आणि डाळिंबाच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. बारामतीमधील विविध भागांना भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश दिला आहे. बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार सकारात्मक निर्णय घेईल.’
कर्जमाफीच्या निकषांत बदल?
‘शेतकऱ्यांकडून कर्जमाफीच्या निकषांत बदल करण्याची मागणी करण्यात येत आहे. ‘एल निनो’चा धोका लक्षात घेता सरकार या सर्व बाबींवर गांभीर्याने विचार करत आहे. कृषिमंत्र्यांशीही चर्चा सुरू आहे,’ असे त्यांनी सांगितले.
