बारामती : बारामती परिसरात गारपीट झाल्यानंतर पहिल्यांदाच येथे आले आहे. माझे कर्तव्य आहे की शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देणे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले आहे. खरेतर शेतकरी नेहमीच चारही बाजूने पिचलेला असतो. त्यातच या झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची मी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी त्यांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचविल्या आहेत. अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

बारामती तालुक्यातील पणदरे, धुमाळवाडी आदी भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रविवारी पहाटेच ग्रामीण भागात भेटी देत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. तसेच, लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून शासनामार्फत मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले.

यावेळी अधिकारीवर्ग, शेतकरी, नागरिक तसेच पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कारखान्यावर येत संचालकांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत कारखान्यासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.