पुणे : ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेच्या रुपाने महात्मा फुले यांच्या गावात पवित्र ज्ञान मंदिर उभे राहणे अभिमानास्पद आहे. शाळेसह या ठिकाणी संशोधन केंद्र, क्रीडा सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकच्या निधीला मुख्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी उपमुख्यंत्री सुनेत्रा पवार यांनी केली.

खानवडी येथे पुणे जिल्हा परिषदेने उभारलेल्या ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पवार बोलत होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुप्रिया सुळे आदी या वेळी उपस्थित होते.

अजित पवार यांच्या हस्ते शाळेचे भूमीपूजन झाले होते अशी आठवण सांगून सुनेत्रा पवार म्हणाल्या, खानवडी येथे उभारण्यात आलेली शाळा फुले यांच्या विचारांचे स्मारक ठरेल. अत्याधुनिक सुविधांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळणार आहे. या शाळेतून संवेदनशील आणि समाजासाठी योगदान देणारे विद्यार्थी घडतील. तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १ हजार शाळा मॉडेल शाळा म्हणून विकसित करण्यात येत आहेत. आतापर्यंत तीनशेहून अधिक शाळांचे काम सुरू झाले आहे, तर पुढील वर्षी सहाशेपेक्षा जास्त शाळांचे काम सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद, ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा प्रकल्प साकारत आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या गावात उभारलेल्या अत्याधुनिक शाळेचे उद्घाटन ही द्विशताब्दी वर्षाची सर्वात योग्य सुरुवात आहे. ‘सीबीएसई’शी संलग्न असलेली ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून या शाळेची उभारणी झाली असून त्यांनी शाळा उभारणीच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष घातले.

स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत महात्मा फुले यांनी भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. फुले यांनी तत्कालीन हंटर कमिशनकडे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची मागणी केली होती. आजचा शिक्षणाचा अधिकार कायदा ही त्याच विचारांची फलश्रुती आहे. महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत राज्य शासन ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ राबवत असून त्याअंतर्गत नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जात आहेत. महात्मा फुले यांच्या नावाने राज्यभरात एक हजार कौशल्य प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. ‘महाज्योती’च्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.