बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी बुधवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे कारखान्याच्या संचालक मंडळात पवार कुटुंबाचे नेतृत्व कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखाना ही बारामती तालुक्यातील महत्त्वाची सहकारी संस्था असून, स्थानिक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीत त्याचा मोठा वाटा आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकाळात कारखान्याने गाळपक्षमतेत वाढ, आधुनिकीकरण आणि शेतकरी हिताच्या विविध योजना राबवल्या. त्यांच्या निधनामुळे संचालकपद रिक्त होते. बुधवारी झालेल्या या जागेवरील निवड प्रक्रियेत सुनेत्रा पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
या निवडीमुळे कारखान्याचे सुरू असलेले प्रकल्प, शेतकरीकेंद्रित धोरणे आणि विकासकामे अधिक गतीने पुढे नेली जातील, असा विश्वास संचालक मंडळातील सदस्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या कारखान्याच्या निवडणुकीत दिवंंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी स्वत:चे नाव जाहीर करत निळकंठेश्वर पॅनल उभे केले. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधक झाली. त्यांच्याविरोधात ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचे सहकार बचाव पॅनल होते. मात्र, अजित पवार यांच्या पॅनलने २० जागा जिंकून कारखाना ताब्यात घेतला. आता अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या संचालकपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे.

