पुणे : ‘अनियमित पाऊस, अनिश्चित हवामान तसेच बाजारपेठांमधील चढउतार यामुळे शेतीमधून शेतकऱ्याला योग्य ते उत्पन्न मिळत नाही. उत्पन्नवाढीसाठी पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे हाच खरा उपाय ठरणार आहे. येणाऱ्या काळात उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी अधिक प्रमाणात करावा लागणार आहे,’ असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने सिंचननगर येथे आयोजित दुसऱ्या ॲग्री हॅकेथॉन स्पर्धेचे उद्धघाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, डॉ. किसन लवांडे, डॉ. राजाराम देशमुख, माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट, डॉ. शंकरराव मगर, डॉ. संजय सावंत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे या वेळी उपस्थित होते.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘हवामान विभागाने यंदा कमी पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. पाऊस कमी झाल्यास आवश्यक उपाययोजना राज्य सरकारकडून केल्या जात आहेत. पुणे आता कृषी तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. राज्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित असून उत्पादन तसेच निर्यातीतही महाराष्ट्र अग्रेसर आहे. उत्पादन वाढीसाठी येणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे. यासाठी राज्य सरकारने ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

युद्धजन्य परिस्थितीत खतांची आवक कमी झाली आहे. मात्र खतांची कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.’ शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळावेत यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्नशील असून त्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. शेती उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळी प्रशिक्षणे, परिसंवाद, प्रात्यक्षिक, कार्यशाळा यांचे आयोजन केले जात असून जिल्हा तालुका तसेच गावाच्या पातळीवर याचे नियोजन होत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी उत्पादन खर्च कमी करून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी झालेल्या हॅकेथॉन स्पर्धेत सुमारे साडेपाचशे नवकल्पना आल्या होत्या. यंदा त्याची संख्या अडीच पटींनी वाढून १३०० वर पोहचली आहे. यातील चांगल्या १२० नवकल्पना प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.’ या स्पर्धेला मिळत असल्याचा प्रतिसाद लक्षात घेता असे कार्यक्रम वारंवार केले जातील अशी ग्वाही जिल्हाधिकारी डुडी यांनी यावेळी दिली.