मुंबई: राज्याचा स्थापना दिवस अर्थात महाराष्ट्र दिन उद्या राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त राज्य सरकार तसेच राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांकडून उद्या राज्यभर विविध कार्यक्रमांचे, उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारच्या वतीने सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी महाराष्ट्र दिन मुख्य शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण व अन्य कार्यक्रम पार पडणार आहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचा महाराष्ट्र दिनाचा पहिलाच शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम असल्याने त्या कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीच दोन दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री पद असतानाही शासकीय ध्वजारोहणासाठी नेहमी पुण्याचीच निवड केली होती. अजित पवारांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांच्याकडेही पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनी त्या कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण करतात याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. सुनेत्रा पवार यांनीही उद्याच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी पुण्याचीच निवड केली होती मात्र आज ऐनवेळी त्यांना ही संधी गमवावी लागली. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुण्याच्या पालकमंत्री असल्या तरी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पुण्याऐवजी बीडमध्ये ध्वजारोहण करावे लागणार आहे.
उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड चे पालकमंत्रीपद होते. पवार यांनी स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन असो वा महाराष्ट्र दिन, सदैव पुण्यातच झेंडावंदनाला प्राधान्य दिले. यावेळी पुण्याच्या पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ही संधी मिळणार होती. राजशिष्टाचार विभागाने तसे आदेशही काढले होते. मात्र निवडणूक आयोगाने त्यात आक्षेप घेत असून बारामती मतदार संघात आचारसंहिता असल्याने आणि सुनेत्रा पवार उमेदवार असल्यामुळे त्यांना ध्वजारोहण करता येणार नाही असे आयोगाने कळविले. त्यानुसार पवार आता पुण्याऐवडजी बीडमध्ये ध्वजारोहण करणार असून राज्यमंत्री माधुरी मिसाळ पुण्यात ध्वजारोहण करणार आहेत. तर बाबासाहेब पाटील अमरावतीमध्ये, योगेश कदम भंडारामध्ये ध्वजारोहण करतील.
