पुणे : ‘महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) एकमेव उमेदवाराच्या पराभवाचे आत्मपरीक्षण केले जाईल,’ असे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या छत्रपती संभाजीनगर येथील विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी पराभव केला. त्या पार्श्वभूमीवर एकीकडे पदवीधर मतदारसंघाची पुण्याची जागा भाजपकडे गेली. त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर येथील उमेदवाराचा पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.

‘कोणत्याही निवडणुकीत जय-पराजय होत असतो. निकाल लागला तरी आत्मपरीक्षण करावे लागते. त्यानुसार आत्मपरीक्षण केले जाईल. त्यातून सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल. या निकालाने खरोखरच आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे वाटते.’

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या घटनेला नऊ महिने झाले. त्या पार्श्वभूमीवर, जय पवार यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या, ‘मुलगा म्हणून जय ‘सीआयडी’ विभागात गेला होता. तेथे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे निधनाच्या घटनेच्या तपासाबाबत माहिती घेतली. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू असून ‘सीआयडी’ने योग्य तो तपास करावा,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.