DCM Sunetra Pawar Shivjayanti Speech On Shivneri: “शिवजयंती हा केवळ उत्सव नाही तर स्वराज्य, स्वाभिमान आणि सुशासनाचा संकल्प दृढ करण्याचा दिवस आहे. शिवजयंतीनिमित्ताने शिवनेरीवर हजर राहणे हा क्षण माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि तितकाच भावनिक आहे”, असे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. यावेळी भाषण करताना सुनेत्रा पवार भावूक झाल्या.
सुनेत्रा पवार भावूक
“हा दिवस माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि जबाबदारीची जाणीव करुन देणारा आहे. नुकतेच मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पण, ज्या कठीण प्रसंगात मी शपथ घेतली त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर आई जिजाऊ उभ्या होत्या”, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. सुनेत्रा पवार यावेळी भावूक झाल्या होत्या.
जिजाऊंनी शिवरायांना स्वराज्याचा ध्यास दिला, संस्कार दिले आणि संकटांशी दोन हात करण्याची जिद्द दिली हीच आपली प्रेरणा असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचा वारसा
अजित पवारांनी ज्या विचारांवर वाटचाल केली तो शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचाराचा वारसा कधीही सोडणार नाही, असेही सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या. शिवजयंतीच्या निमित्ताने अजित पवार शिवनेरीवर कायम उपस्थित राहत होते, असेही पवार यांनी सांगितले. शिवनेरीबाबत अजित पवारांच्या आठवणी आणि दृष्टीकोन सांगताना सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला.
अजित पवार यांनी शिवनेरी विकास आराखडा, रायगड विकास आराखडा, आग्रा आणि संगमेश्वर येथील स्मारकासाठी अजित पवार यांनी पुढाकार घेऊन पाठपुरावा केला, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या.
शिवरायांनी रयतेचं राज्य निर्माण केलं – एकनाथ शिंदे
‘किल्ले शिवनेरीवर आल्यानंतर नवी उर्जा आणि प्रेरणा मिळते’, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ‘शिवरायांनी रयतेचं राज्य निर्माण केलं, त्यांनी शेतकऱ्यांना सैनिक केलं. येथील मातीच्या कणाकणात शिवाजी महाराज आहेत’, असे एकनाथ शिंदे म्हणाले. शिवरायांनी दिलेला आत्मनिर्भरतेचा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंगीकारला असून, त्याचा देशाला पुढे घेऊन जाईल, असे शिंदे म्हणाले.

