पुणे : ‘मंगेशकर कुटुंबीय कोणाला फारसं काही देत नाहीत; पण मला त्यांनी भेट दिली आहे,’ असे मिश्कील विधान करून भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी रविवारी पुण्यातील एका कार्यक्रमात उपस्थितांना खळखळून हसवले. त्यांच्या या विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, हास्याची लकेर आणि कुजबुज रंगली. शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरियल ट्रस्टच्या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ‘राष्ट्रीय एकात्मतेपुढील आव्हाने’ या विषयावर देवधर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी आपल्या गाण्याच्या आवडीचा उल्लेख करत नेहमीच्या गंभीर विषयाला हलकाफुलका रंग दिला.
‘काही जण किराणा घराण्याचे, काही लखनौ घराण्याचे गायक असतात. मी मात्र हमाम घराण्याचा अर्थात बाथरूम सिंगर आहे,’ असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. त्यावरच न थांबता, ‘हिंदी चित्रपटसृष्टीतील पाच हजार ते सहा हजार गाण्यांचे अंतरे आणि मुखडे मला तोंडपाठ आहेत. या बाबतीत मला सहज हरवणे कठीण आहे,’ असेही त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले.
मंगेशकर कुटुंबीयांनी दिलेली भेट
यानंतर देवधर यांनी थेट मंगेशकर कुटुंबीयांचा उल्लेख करून आणखी एक रंजक आठवण सांगितली. ‘लता मंगेशकर आणि आशा भोसले या माझ्या अत्यंत आवडत्या गायिका आहेत. एकदा त्या दोघींबरोबर मला तब्बल पावणेदोन तास वेळ मिळाला. त्यांनी मला उपमा, पोहे, आइस्क्रीम, कॉफी असा पाहुणचार केला. आणि निघताना लतादीदींनी मला ‘सारेगामा कारवा’ भेट दिला. मंगेशकर कुटुंबीय कुणाला फारसं काही देत नाहीत; पण मला त्यांनी भेट दिली होती,’ असे त्यांनी सांगितले. देवधर यांच्या या वाक्यानंतर सभागृहात पुन्हा एकदा हास्यकल्लोळ उसळला. कार्यक्रम संपल्यानंतरही उपस्थितांमध्ये त्यांच्या या किश्श्याचीच चर्चा रंगली.
