पुणे :  एका मराठी उद्योजकाने जपानमध्ये मोठी भरारी घेतली आहे. सुनील कुलकर्णी असे या उद्योजकाचे नाव असून ते पुण्यात मुख्यालय असलेल्या फिडेल सॉफ्टेक लिमिटेड कंपनीचे मुख्याधिकारी आहेत. फिडेलने जपानमधील ३० वर्षांहून अधिक काळ सेवा देत असलेली आयएम कॉर्पोरेशन ही कंपनी ताब्यात घेतली आहे. या व्यवहारामुळे फिडेल सॉफ्टेक कंपनीच्या जागतिक पातळीवरील विस्तार मजबूत झाला आहे

फिडेलने आयएम कॉर्पोरेशन या आयटी सल्लागार आणि सॉफ्टवेअर सर्व्हिस कंपनीमध्ये मालकी हिस्सेदारी संपादित केली. या संपादनामुळे जपानमधील फिडेलच्या स्थानिक सेवा वितरण क्षमतेला बळकटी मिळेल. तसेच जपानी कंपन्यांसाठी फिडेलच्या एंटरप्राइज आयटी आणि कृत्रिम प्रज्ञा ( एआय) -चलित सेवांच्या विस्तारास पाठबळ मिळेल. फिडेलचे मुख्याधिकारी सुनील कुलकर्णी आणि आयएम कॉर्पोरेशनचे मुख्याधिकारी किकुची-सान यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल घोषणा केली. ते म्हणाले की, फिडेल या जागतिक एआय-चालित नेतृत्वाखालील एंटरप्राइझ बीटूबी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सर्व्हिसेस कंपनीने आज ३० वर्षांहून अधिक इंडस्ट्री अनुभव असलेल्या तसेच जपानमधील तंत्रज्ञान सल्लागार आणि डीएक्स सेवा पुरवणारी आयएम कॉर्पोरेशन कंपनी अधिग्रहित केली आहे. या धोरणात्मक संपादनामुळे जपानमधील फिडेलची स्थानिक सेवा वितरण उपलब्धतेला बळकटी मिळाली असून जागतिक विस्तार आणि एआय नवोन्मेषाला चालना मिळाली आहे.

तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेली आयएम कॉर्पोरेशन ही कंपनी टिअर-१ जपानी सिस्टीम इंटिग्रेटर्स आणि एंटरप्राइझ ग्राहकांसाठी फंक्शनल कन्सल्टिंग, एंटरप्राइझ तंत्रज्ञान सेवा आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सपोर्ट सेवा देते. गेल्या तीन वर्षांमध्ये कंपनीने स्व-मालकीच्या न्युरल नॉलेज फ्रेमवर्कचा उपयोग करून एआय- सहाय्यक सेवा मॉडेल विकसित करून त्याची अंमलबजावणी केली आहे, ज्यामुळे ग्राहक कंपन्यांना वितरण उत्पादकता आणि अनुभवसिद्ध माहितीचा पुनर्वापर सुधारण्याच्या दृष्टीने मदत झाली आहे.

या अधिग्रहणामुळे फिडेलच्या जपानमधील कामकाजाचा विस्तार एकत्रितपणे दोनशेहून अधिक व्यावसायिकांपर्यंत वाढला आहे. त्यातून कंपनी आताजपानमध्ये कार्यक्षम ऑनग्राउंड डिलिव्हरी उपलब्ध असलेल्या प्रमुख मूळ-भारतीय तंत्रज्ञान सेवा प्रदात्यांपैकी एक ठरली आहे. जागतिक स्तरावर, फिडेल समूहाकडे आता पाचशेहून अधिक कर्मचारी आहेत. ते विविध देशांतील ग्राहकांना तांत्रिक साहाय्य करतात. या भागीदारीमुळे जपानी व्यवसायांच्या बदलत्या गरजांनुसार तयार केलेल्या एआय-चालित सेवा, एंटरप्राइझ सोल्यूशनचे कार्यान्वयन, बायलिंग्वल कन्सल्टिंग, मॅनेज्ड सर्व्हिसेस आणि भाषा स्थानिकीकरण सेवा पुरवण्याच्या फिडेलच्या कार्यक्षमतेमध्ये अधिक सुधारणा झाली आहे.

सुनील कुलकर्णी कोण आहेत?

सुनील कुलकर्णी हे पहिल्या पिढीतील उद्योजक असून ‘फिडेल सॉफ्टेक लिमिटेड’ या भारतातील सूचिबद्ध कंपनीचे संस्थापक मुख्याधिकारी आहेत. त्यांच्याकडे जपान-भारत यांच्यातील हाय-टेक तंत्रज्ञान, बायलिंग्वल कन्सल्टिंग आणि भाषा अभियांत्रिकी क्षेत्रात काम करण्याचा २५ वर्षांचा अनुभव आहे. ते स्वतः बहुभाषिक असून त्यांचे मराठी, हिंदी, जपानी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे.