राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेमुळे पुण्यातील आघाडीचे भवितव्य टांगणीला लागले आहे. तटकरे यांच्या टीकेनंतर आता काँग्रेसने आधी माफी नंतरच आघाडीची चर्चा, अशी कठोर भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी तटकरे यांनी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे जोपर्यंत तटकरे त्यांची जाहीर माफी मागत नाहीत तोपर्यंत राष्ट्रवादीशी आघाडीविषयी चर्चा करता कामा नये, असे पत्र नगरसेवक संजय बालगुडे यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना दिले आहे. या प्रकरणामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी आघाडी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र त्यापूर्वी तटकरे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केल्याने नव्या वादाला सुरुवात झाल्याचे पाहावयास मिळत आहे. जोपर्यत जाहीर माफ़ी मागत नाही तो पर्यंत आघाडीची चर्चा नको, असे अशी भूमिका नगरसेवक बालगुडे यांनी घेतल्याने आगामी काळात हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. याविषयी बालगुडे म्हणाले की,  पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी भ्रष्टाचाराच्या फायलीवर सह्या न केल्याने त्या विषयी त्यांच्या मनात राग आहे. तटकरे यांच्या तोंडातून भाजप बोलत आहे, अशा शब्दात बालगुडे यांनी तटकरेंवर हल्ला चढवला.