मुलाखत : ध्यास ग्रामविकसनाचा

  सन १९९४ साली कुसगाव येथे मुलींसाठी योजलेल्या भरतकाम प्रशिक्षणवर्गाची माहिती मला मिळाली.

सुनीता गायकवाड 

डोंगरकुशीतील कातळातून ठिबकणारे थेंब थेंब पाणी, ऐन उन्हाळ्यात ती छोटी मुलगी तिच्या हातातील वाटीमध्ये जमा करीत होती. अशा प्रयत्नातून, चार-पाच तासांनंतर तिचा हंडा भरल्यावर तो डोक्यावर घेऊन प्रदीर्घ पायपिटीनंतर ती घरी पोचणार होती. शहरी भागातील बालके ज्या काळात, मे महिन्याची सुटी आनंदात व्यतीत करतात त्याच वेळी पुण्यापासून पन्नास किलोमीटरवर असलेल्या गावातील ही दुरवस्था व्यथित करून गेली.. ज्ञान प्रबोधिनीच्या ग्राम विकसन प्रकल्पाच्या प्रमुख सुनीता गायकवाड सांगत होत्या.. आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाबरोबर प्रत्यय येत होता त्यांच्या कार्यनिष्ठेचा, संस्थेविषयीच्या आत्मीयतेचा आणि विनम्रतेचा. ग्रामीण भागात वेगळ्या पद्धतीने काम करणाऱ्या सुनीताताईंशी साधलेला हा संवाद. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा नुकताच गौरवही करण्यात आला.

सामाजिक कार्यात, ग्रामविकसनाच्या कार्यात प्रवेश कसा झाला?

गोपाळ हायस्कूलमधील शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर फॅशन डिझायनिंग, होम सायन्स, बी.ए. आणि नुकतीच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची एम.एस.डब्ल्यू. ही पदवी प्राप्त केली. ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना शिवणकामाचे धडे देताना वेल्हा, शिवापूर या भागातील पाणीटंचाईच्या समस्यांचे गांभीर्य जवळून अनुभवले. महिलांची मुख्य समस्या असूनही निवारण कार्यात भाग घेणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि प्रशासकीय व्यवस्थेत महिलांचा सहभाग अभावानेच आढळला. ज्ञान प्रबोधिनी प्रकल्पात सहभागी होण्याचा निश्चय या विचारातून पक्का झाला. त्यातूनच सामाजिक कार्य सुरू झाले. मात्र वैयक्तिक माझ्याबाबत सांगण्यापेक्षा आमच्या संस्थेच्या कार्याबद्दल, ग्रामविकास योजनांबद्दल माहिती द्यायला मला नेहमीच आवडते. मुख्य म्हणजे मी हे काम एकटीने केलेले नाही. माझ्या सर्व सहकाऱ्यांमुळे मी हे काम करू शकते. पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या ग्रामस्थांना सामूहिक प्रयत्नातून आम्ही जेव्हा नितळ पाण्याने तुडुंब भरलेली विहीर अर्पण करतो, तोच आमच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो.

महिलांसाठीचे काम कसे सुरू झाले?

सन १९९४ साली कुसगाव येथे मुलींसाठी योजलेल्या भरतकाम प्रशिक्षणवर्गाची माहिती मला मिळाली. याच काळात पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या महिलांच्या व्यथा समजल्या. वेल्हा-पवारमाळ येथे शिवणकाम-भरतकाम प्रशिक्षण वर्गाची मी तेव्हा समन्वयक होते. सन १९९९ ते २००२ या काळात त्यांनी स्त्रीशक्ती प्रबोधन प्रकल्पात अध्यापनाचे धडे दिले. आंबवणे येथील युरिया उत्पादन प्रकल्पाचे संपूर्ण संयोजन करताना शासकीय योजना, सुविधा, अडचणी आणि लाभधारकांच्या अपेक्षा यांचा समन्वय साधण्याचे भलेबुरे अनुभव आले. नाबार्ड पुरस्कृत वारली आणि बांबू प्रशिक्षण वर्ग, राजर्षी शाहू योजना, कस्तुरबा महिला प्रशिक्षण केंद्र, कपार्ट, नाबार्ड, युनिकोड या शासकीय योजनांचे प्रकल्प मुख्यत्वे शिवापूर भागात आम्ही राबवले. राम-सीता पुराणिक तंत्रनिकेतन, चेतना महिला विकास केंद्र, मुळगावकर फाउंडेशन, पर्सिस्टंट, न्यू होरायझन इ. खासगी स्वयंसेवी संस्थांचे अनमोल सहकार्य आम्हाला या विविध प्रकल्पांमध्ये लाभले.

ग्रामीण भागात नेमके कशा स्वरुपाचे काम सुरू आहे?

ज्ञान प्रबोधिनीच्या ग्रामविकसन विभागाच्या पाणीटंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत वेल्हे परिसरात २१ विहिरींचे निर्माण होत आहे. त्यापैकी सात विहिरींचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित चौदा विहिरी नियोजनबद्धतेने लवकरच पूर्ण होतील. या प्रकल्पामध्ये अजित देशपांडे, सुनील जोरकर, पंकज शिर्के, बापू जोरकर, शैला भोंडेकर हे सहकारी आहेत. या प्रकल्पाची नियोजनबद्धता लक्षात घेतली तर कार्याची दिशा नेमकेपणाने स्पष्ट होईल. ज्या भागात जलसंधारण प्रकल्प राबवायचा असतो त्या क्षेत्राचा पूर्ण अभ्यास केला जातो. परंपरागत पाणलोट क्षेत्र, नदी, ओढे, झरे, बंधारे, त्यांची साठवणक्षमता, जुन्या विहिरी, शेततळी, पर्जन्यमान, लोकवस्ती, शासकीय योजना यांची सांगड घातली जाते. गावक ऱ्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन त्यांना मुख्यत्वे श्रमदानामध्ये सामावून घेतले जाते. शासकीय योजनांची माहिती घेऊन अर्थबळ तयार केले जाते.

या व्यतिरिक्त काही देणगीदार आणि जरूर तेथे ज्ञान प्रबोधिनी स्वत:चा निधी उपलब्ध करून देते. या सर्व कार्यव्यवहारामध्ये चिकाटी आणि पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची असते. शासकीय उदासीनता, गावक ऱ्यांचे मर्यादित ज्ञान, युवाशक्तीचा जोश यांची सांगड घालून प्रकल्प सिद्धीस नेणे हे काम मोठय़ा जिकिरीचे असते. त्यामुळेच नितळ पाण्याने तुडुंब भरलेली विहीर गावक ऱ्यांकडे सोपवताना मनात कृतकृत्यतेची भावना असते. कोणत्याही कार्यात कुटुंबीयांची साथदेखील महत्त्वाची असते. ती देखील मला मिळाली आहे. चाकोरीबद्ध आयुष्य जगण्यापेक्षा मुलगी समाज आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी कार्य करते, याचे मोठे कौतुक आईला वाटते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sunita gaikwad head of village development project rural development

ताज्या बातम्या