बारामती : पाटस मार्गे सुप्याकडे शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक करणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) बस आज सकाळी साडेसातच्या सुमारास सुपे घाटातील पहिल्या वळणावर पलटी झाली. या बसमधून प्रवास करणाऱ्या ६० ते ७० विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांच्यावर लोणी काळभोर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुसेगाव, पडवी आणि परिसरातील विद्यार्थ्यांना घेऊन बस सुप्याकडे येत होती. घाटातील पहिल्या वळणावर चढ चढत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यानंतर बसने दोन पलट्या घेत रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याअभावी खाली कोसळली. अपघातात जखमी झालेल्या चार विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. बारामती विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलचे हे विद्यार्थी आहेत. शाळेचे मुख्याध्यापक पाटील यांनी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असल्याची माहिती दिली.

पालकांकडून सुरक्षेबाबत प्रश्न

या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शालेय बसची नियमित तांत्रिक तपासणी केली जाते का, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. बसचे ब्रेक, इंजिन, टायर, हॉर्न यांसह इतर यंत्रणांची तपासणी झाली होती का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बसचा दररोजचा सुरक्षा अहवाल ठेवावा, तसेच शालेय वाहतूक व्यवस्थेची नियमित तपासणी करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. सुपे घाटातील धोकादायक वळणावर कठडा आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात येत आहे. योगेंद्र पवार यांची घटनास्थळी भेट घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी भेट दिली.