पुणे : पशुधन योजनेतंर्गत लाभार्थी म्हणून नोंद करण्यासाठी शेतकऱ्याकडून पाच हजारांची लाच घेणाऱ्या खेड तालुक्यातील पशुधन पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.

बंडू बबन देवकर (वय ४३) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पर्यवेक्षकाचे नाव आहे. याबाबत एका शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराने पशुधन योजनेतंर्गत दुधाळ गायी आणि म्हशी वाटप योजनेत लाभार्थी म्हणून नोद करावी, असा अर्ज खेड तालुक्यातील कुडे बुद्रुक गावचे पशुधन पर्यवेक्षक बंडू देवकर याच्याकडे अर्ज दिला होता. लाभार्थी म्हणून नोंद करण्यासाठी देवकरने त्यांच्याकडे सात हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने तडजोडीत पाच हजार रुपयांची लाच देण्याचे मान्य करून ‘एसीबी’कडे तक्रार दिली.

हेही वाचा >>>शिष्यवृत्तीच्या किती अर्जांची पडताळणी प्रलंबित? महाडीबीटी पोर्टलच्या अहवालातून आकडेवारी उघडकीस

त्यानंतर मंगळवारी सायंकाळी सापळा लावून देवकरला शेतकऱ्याकडून पाच हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशीरा देवकर याच्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक रुपेश जाधव तपास करत आहेत.