पुणे : सक्तवसुली संचलनालय (ईडी), प्राप्तिकर आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून दडपशाही करणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी नाकारले, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे महायुतीवर टीका केली. माझी लढाई ही वैयक्तिक नाही, तर वैचारिक आहे, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या अजित पवार यांच्यावरही टीका केली.

लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. तर, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामतीमधील निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा एकतर्फी पराभव केला. या विजयानंतर सुळे गुरुवारी पुणे येथील त्यांचा संपर्क कार्यालयात आल्या होत्या. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुळे यांचे जोरदार स्वागत केले. ढोल-ताशांच्या निनादात गुलाल उधळत त्यांचा विजय साजरा करण्यात आला. त्यानंतर सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महायुतीवर जोरदार टीका केली. ‘महाविकास आघाडीला राज्यात मिळालेले यश हे कार्यकर्त्यांचे आहे. गेले एक वर्ष महाविकास आघाडीसाठी संघर्षाचे राहिले. महागाई, दुष्काळ, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार राज्यात बोकाळला होता. मात्र, त्याकडे लक्ष न देता ईडी, सीबीआय किंवा अन्य तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दडपशाहीला मतदारांनी नाकारले,’ असे सुळे यांनी स्पष्ट केले. वयाने आणि कर्तृत्वाने मोठे असणाऱ्यांना सल्ला द्यायचा नसतो, तर त्यांचा सल्ला घ्यायचा असतो. बारामतीमध्ये झालेला विकास कोणीही नाकारला नव्हता. लोकसभेची निवडणूक वैयक्तिक नव्हती, तर ती विचारधारेविरोधात होती, असे उत्तर त्यांनी अजित पवार यांना कोणता सल्ला द्याल, या प्रश्नावर दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule allegation that the oppressors were rejected through ed cbi amy
First published on: 07-06-2024 at 06:33 IST