बारामती : ‘माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचा फोटो वापरण्याऐवजी त्यांचे विचार कृतीतून दिसू द्या. चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले. त्यांनी दुसऱ्यालाही संधी दिली,’ असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षपुरस्कृत ‘बळीराजा शेतकरी सहकार बचाव पॅनल’च्या प्रचाराची सांगता सभा झाली. त्या वेळी खासदार सुळे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले. त्यांनी दुसऱ्यालादेखील संधी दिली. सहकार आणि पक्ष या वेगळ्या बाबी असून, दुर्दैवाने सहकारी निवडणुकीत पक्ष आणला जात आहे.’
सुळे म्हणाल्या, ‘माळेगाव कारखान्याच्या उभारणीत आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे योगदान आहे. मात्र, या गोष्टीचा काहींना विसर पडला आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बळीराजा शेतकरी सहकार बचाव पॅनल’चे उमेदवार चांगले काम करतील. पाच वर्षे शेतकऱ्यांना योग्य भाव देतील. हा कारखाना सहकारीच राहील. स्वच्छ आणि पारदर्शक कारभारासाठी पॅनलच्या उमेदवारांना निवडून द्या.’ असे आवाहन खासदार सुळे यांनी केले.
युवा नेते युगेंद्र पवार म्हणाले, ‘शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकही खासगी कारखाना काढला नाही. त्यांनी जानाई-शिरसाई योजना सुरू केल्याने जिरायती भागातील शेतकरी ऊसउत्पादक झाला आहे. शरद पवार यांच्या सूचनेनुसार जिरायती भागातील शेतकरी माळेगाव कारखान्याचे सभासद झाले आहेत.’
बँकेची शाखा रात्री सुरू का?
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बारामतीतील शाखा रात्री सुरू का होती, एवढ्या रात्री बँकेत नेमके काय काम चालले होते, ही बँक कोणाच्या मर्जीने चालते, असे सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले. बँकेत झालेल्या प्रकाराच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ नेमण्याची मागणी संसदेत करणार आहे,’ असे खासदार सुळे यांनी सांगितले.
उद्या मतदान
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराची शुक्रवारी सांगता झाली. रविवारी (२२ जून) मतदान होणार आहे. २४ जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे. या कारखान्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ‘श्री निळकंठेश्वर पॅनल’, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ‘बळीराजा सहकार बचाव पॅनल’, कारखान्याचे माजी अध्यक्ष, भाजपचे नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचे ‘सहकार बचाव शेतकरी पॅनल’ आणि कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचे पॅनल यांच्यात चौरंगी लढत आहे.