पुणे ः महाराष्ट्राची गुन्हेगारांची राजधानी अशी ओळख पुण्याची निर्माण होत असून याला पूर्णपणे पुण्याचे कारभारी आणि पोलीस खाते जबाबदार असून पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी केली. गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात वाढत असलेली गुन्हेगारी हे सरकारचे अपयश असल्याची टीका त्यांनी केली.

पुण्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांनी शनिवारी मोदीबागेत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. काही आठवड्यापूर्वी फुटलेला ‘नीट’ परीक्षेचा पेपर असो, वाढती महागाई, राज्यातील महिला, अल्पवयीन मुलींवर वाढलेले अत्याचाराच्या घटना याला पूर्णपणे सरकार जबाबदार असल्याचा आरोप खासदार सुळे यांनी केला.

केंद्र सरकारने देशातील गुन्हेगारीबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये देशात गुन्हेगारीमध्ये पुण्याचा क्रमांक पाचवा तर महाराष्ट्रात पहिला लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी गुन्हेगारीमध्ये नागपूर हे पहिल्या क्रमांकावर होते. मात्र आता पहिल्या क्रमांकावर पुणे शहराचा क्रमांक लागला आहे, ही मोठी दुर्दैवी गोष्ठ आहे. विषारी दारू पिल्याने १८ पेक्षा अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला. हा गंभीर प्रकार आहे. पुणे शहर आतापर्यंत शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जात होते. अनेक नामांकित शिक्षण संस्था येथे असल्याने राज्यासह देशातील आणि परदेशातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात.

गेल्या काही महिन्यांपासून शहरात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पाहता. गुन्हेगारीची राजधानी अशी ओळख पुणे शहराची होऊ लागली आहे. याला शहराचे कारभारी आणि पोलीस खात्याचा कारभार जबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली.

विषारी दारु प्रकरणात पोलीस यंत्रणा तसेच उत्पादन शुल्क विभाग दोन्ही खात्यांची चौकशी झाली पाहिजे. फक्त अधिकाऱ्यांना निलंबित केल्याने काय होणार आहे. पुणे पोलीस आणि महाराष्ट्राचे सरकार काय करत आहे? याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. पुण्याचे पोलीस आयुक्त अपयशी ठरले आहेत. त्यांनी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.

काँग्रेसमुक्त की काँग्रेसयुक्त भाजप

देश काँग्रेसमुक्त करण्याची घोषणा केंद्रात असलेल्या भारतीय जनता पक्षाने केली होती. मात्र सध्या भाजपमध्ये नेत्यांची संख्या पाहिली की काँग्रेस मुक्त की काँग्रेस युक्त भाजपचे स्वप्न होते, हे लक्षात येत नाही. राष्ट्रवादीचे नेते माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजपमध्ये प्रवेशावर देखील खासदार सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, ‘प्रत्येकाच्या काही अडचणी असतात. पण सगळ्याच गोष्टी कॅमेऱ्यावर बोलायच्या नसतात’. तनपुरे मला भेटले होते. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात राम शिंदे वगळता इतर सर्व नेतृत्त्व हे काँग्रेसचे आहे. लोकांना बदल हवा होता, पण काय बदलले. जी १०० कुटुंबे काल काँग्रेसमध्ये होती. ती भाजपमध्ये गेली. बदल काय झाला, असा खोचक सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.