पुणे: राज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचे अधिवेशन सुरू असताना पुणे-मुंबई दरम्यानची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. या गंभीर परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला आहे.
“एवढे मोठे प्रकल्प करताना सरकारने पर्यावरणाचा अजिबात विचार केलेला नाही. परिणामी, अवघ्या एका पावसात संपूर्ण महाराष्ट्र पॅरलाइझ (ठप्प) झाला आहे,” अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. “सत्तेतील लोक नेहमी ७० वर्षांचा हिशोब मागतात, पण गेल्या १२ वर्षांपासून सत्तेत बसलेल्या या लोकांच्या कामाचा हिशोब कोण देणार?” असा प्रश्न उपस्थित करत सुळे यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत असलेल्या भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना चांगलेच धारेवर धरले. राज्याचे अधिवेशन सुरू असताना अशी स्थिती निर्माण होणे हे सरकारचे अपयश असल्याचे त्या म्हणाल्या.
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी सकाळी महापालिकेत भेट दिली. त्यावेळी त्यांनी महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, पुणे-मुंबई दरम्यानची कनेक्टिव्हिटी पूर्णपणे ठप्प होणे ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. हे सरकार स्वतःला ‘इन्फ्रास्ट्रक्चरचे सरकार’ म्हणवून घेते, पण जर त्यात जनतेची सुरक्षाच नसेल आणि पर्यावरणाचा कोणताही विचार नसेल, तर अशा कामांचा काय उपयोग?” असा संतप्त सवाल सुळे यांनी केला. सध्याच्या सद्यस्थितीत नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन त्यांनी केले असून मुख्यमंत्र्यांनी राज्यात तातडीने ‘एमर्जन्सी’ घोषित करावी, अशी मागणी केली.
तुमच्या १२ वर्षांचा हिशोब कोण देणार?
विरोधी पक्षांवर नेहमी ७० वर्षांच्या कार्यकाळावरून टीका करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, “गल्लीपासून दिल्लीपर्यंत आज यांचेच सरकार आहे. सत्ताधारी नेहमी ७० वर्षांचा हिशोब मागतात, पण आज महाराष्ट्राची जी दुर्दशा झाली आहे, त्यावरून यांच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाचा हिशोब कोण देणार? सत्तेतील लोकांना केवळ पक्ष फोडण्यात आणि घरे फोडण्यात रस आहे. हे पाप करण्यासाठी सरकारकडे वेळ आहे, मात्र जनतेच्या सुरक्षेचे नियोजन करण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही,” असा टोला त्यांनी लगावला. पुण्यात पडणारी झाडे आणि विस्कळीत झालेले जनजीवन पाहता, सरकारचे नियोजन केवळ ‘इन्फ्रा’ आणि ‘कंत्राटदारां’साठीच आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
‘मिसिंग लिंक’च्या कामाची चौकशी करा
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सुरुवातीला वेळ वाचणार म्हणून आम्हीही या ‘मिसिंग लिंक’चे कौतुक केले. पण आता तिथले जे व्हिडिओ समोर येत आहेत, ते पाहून सुरुवातीला मला वाटले की हे व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारे (एआय) बनवले आहेत की काय? पण प्रत्यक्षात तिथे अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. एवढा निधी खर्च करूनही कामात स्पष्ट ‘मिसमॅच’ दिसत आहे. यात मी थेट घोटाळा झाला असे म्हणणार नाही, पण या कामावर किती पैसे खर्च झाले आणि याचे ऑडिट झाले का? या सगळ्याची उत्तरे सरकारला द्यावीच लागतील. या कामाची पारदर्शक चौकशी झालीच पाहिजे.” अशी मागणी त्यांनी केली.
राम मंदिर दान पेटीत चोरी आणि भ्रष्टाचार दुर्दैवी
अयोध्या आणि उज्जैन आमच्यासाठी श्रद्धेची आणि आस्थेची केंद्र आहेत, असे म्हणत खासदार सुळे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपवर तोफ डागली. “राम मंदिरासाठी भाजपच्या काही नेत्यांनी खूप मोठा संघर्ष केला. आज मंदिराच्या दानपेटीत चोऱ्या होत आहेत, तिथे भ्रष्टाचार सुरू आहे, हे पाहताना त्यांना काय वाटत असेल? प्रभू रामाच्या समोर उघडपणे चोऱ्या सुरू आहेत आणि हे आम्ही सहन करणार नाही. तिथल्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करण्यासाठी खासदार निलेश लंके अयोध्येला जाऊ इच्छितात, पण त्यांना तिथे परवानगी नाकारली जात आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.” असेही त्या म्हणाल्या.
