पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबाबत आमदार रोहित पवार हे मुद्दे उपस्थित करत आहेत. ते अस्वस्थ असून, त्यांची काळजी वाटत आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांना सुरक्षा द्यावी,’ अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, ‘अजित पवार यांंच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. जनभावना तीव्र असून आमदार रोहित पवार हे अतिशय अभ्यासपूर्ण काही तथ्ये, शंका उपस्थित करत आहेत. त्यांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. या घटनेतील सत्य लोकांसमोर पारदर्शक पद्धतीने पुढे येणे अतिशय गरजेचे आहे.
मात्र, आमदार रोहित पवार यांची काळजी वाटत असल्याने त्यांना राज्य सरकारने सुरक्षा द्यावी.’ ‘विमान अपघातात ‘ब्लॅक बॉक्स’ नष्ट होऊ शकत नाहीत. दुर्घटनेचे पारदर्शक आणि निर्विवाद सत्य पुढे आले पाहिजे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी जय पवार यांनीही केली आहे.’ असे खासदार सुळे यांनी स्पष्ट केले.
दोन्ही ‘राष्ट्रवादी’ विलीन करण्याबाबत खासदार सुळे म्हणाल्या, ‘मुंबईत झालेल्या बैठकीला मी नव्हते. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भूमिका मांडली आहे. माझा भाऊ गेला. त्याचे दु:ख आयुष्यभरातील भरून येणार नाही. आमचा कुटुंब प्रमुख राहिला नाही, तर आता कोणाबरोबर खरे-खोटे करत बसायचे? आम्हाला एकत्र काम करण्याची इच्छा होती. आता या गोष्टीला पूर्णविराम द्यावा. वास्तव काय आहे, हे मला आणि अजितदादांना माहीत होते.’
मंत्रालयात मंत्र्याच्या दालनात लाच स्वीकरल्याच्या प्रकरणाबाबत खासदार सुळे म्हणाल्या, या प्रकरणाची चौकशी आता मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहिजे. कारवाई करण्यात आलेल्या इमारतीचे आणि गृह खात्याचे प्रमुख मुख्यमंत्री फडणवीस हे आहेत. त्यामुळे यांनी उत्तर दिले पाहिजे, गृहमंत्रालयातील अधिकाऱ्याने ही कारवाई केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून उत्तर द्यावे.’
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अरबी समुद्रात उभारण्याबाबत खासदार सुळे म्हणाल्या, ‘सत्ताधारी पक्षाने आता हा विषय मागे ठेवलेला दिसत आहे. त्यावर ते बोलत नाहीत.’
ज्येष्ठ नेते शरद पवार कार्यरत
प्रकृती बिघडल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यात खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याबाबत खासदार सुळे म्हणाल्या, ‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती व्यवस्थित आहे. आता ते नागरिकांच्या भेटीगाठी घेऊ लागले आहेत.
