पुणे : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणे’योजनेतील सुमारे ८० लाख महिला अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. महिलांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला अपात्र ठरत असतील, तर प्रत्यक्ष लाभार्थी कोण होते, याची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात यावी,’ अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने खासदार सुळे यांनी काँग्रेस भवन येथे भेट दिली. त्यावेळी काँग्रेसच्या पश्चिम विभागाच्या शहराध्यक्षा दीप्ती चवधरी, माजी महापौर अंकुश काकडे, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते चंदू कदम, नगरसेवक काका चव्हाण आदी उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या, ‘लाडकी बहीण योजनेअंतर्गत २.३८ कोटी महिलांना लाभ दिल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात येत होता. ‘केवायसी’ बंधनकारक करण्यात आल्यावर टप्प्याटप्प्याने लाभार्थी संख्या कमी होत गेली. आता सुमारे ८० लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सुमारे १.६६ कोटी महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. अपात्र महिलांमधील प्रत्यक्ष लाभार्थी कोण होते?, त्यांच्याकडून आता वसुली करणार का? याची माहिती सरकारने दिली पाहिजे. त्यासाठी या प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करण्यात यावी.’
‘या योजनेचा लाभ महिलांना मिळाला पाहिजे. त्यासाठी विशिष्ट मुदतीत ‘केवायसी’ करण्याची अट अन्यायकारक ठरू नये. राज्यातील एकही पात्र महिला तांत्रिक कारणांमुळे या योजनेपासून वंचित राहू नये, याची खबरदारी सरकारने घ्यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आणि बालविकास विभागाकडून याबाबतची माहिती घेतली पाहिजे,’ असे खासदार सुळे यांनी स्पष्ट केले.
‘पोलीस आयुक्तांनी अमित शहा, फडणवीसांना माहिती द्यावी’
‘पुण्यातील गुन्हेगारीत घट झाल्याबाबतची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. मात्र, पुण्यातील गुन्ह्यांबाबत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पुणे पोलिसांच्या माहितीमध्ये तफावत आहे. पोलीस आयुक्तांनी ही माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही माहिती द्यावी.’ असेही खासदार सुळे म्हणाल्या.
‘पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे. मात्र, पोलिसांना गुन्हे दिसत नाहीत का? विषारी दारूमुळे नागरिकांचे मृत्यू झाले. मात्र, पोलिसांना दारुमध्ये कोठे भेसळ होते, ही माहिती नव्हती का? असे सवाल खासदार सुळे यांनी केले.
पुण्याकडे लक्ष देणार
‘आगामी काळात शिरूर आणि बारामती मतदारसंघांप्रमाणे पुणे शहराकडे लक्ष देणार आहे त्यासाठी मी आणि खासदार अमोल कोल्हे हे महिन्यातून एकदा पुण्यात महाविकास आघाडीची बैठक घेणार आहोत; तसेच जिल्हा परिषदेमध्येही महाविकास आघाडीची बैठक घेतली जाणार आहे.’ असे खासदार सुळे यांनी सांगितले.
अर्जाची छाननी सुरू असताना थकीत कर भरता येतो का?
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार विक्रम काकडे यांच्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला. याबाबत खासदार सुळे म्हणाल्या, ‘काकडे यांनी उमेदवारी अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये कोणत्याही कराची थकबाकी नसल्याची माहिती दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी उमेदवारी अर्जाची छाननी सुरू असताना सुमारे ३९ हजार रुपयांचा कर भरला आहे. अर्जाची छाननी करताना कर भरता येतो का? याबाबत निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईल,’ असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
