पुणे : पुण्यातील भरदिवसा गोळीबार, कोयते उगारून दहशत माजविण्याच्या घटना वाढीस लागल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त करुन पोलिसांच्या कार्यक्षमतेवर टीका केली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या कार्यपद्धतीवर टीका करुन त्यांनी पोलीस आयुक्तांना थेट सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी केली होती. सुळे यांच्या टीकेनंतर पोलीस आयुक्तांनी सुळे यांना पुणे पोलिसांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेणारे पत्र पाठविले आहे. या पत्रात पुण्यातील गुन्हेगारीत घट झाल्याचा दावा पोलीस आयुक्तांनी केला आहे.

पुणे-सातारा रस्त्यावर पंधरा दिवसांपूर्वी भरदिवसा टोळीयुद्धातून तरुणावर गोळीबार करुन कोयत्याने वार करण्यात आले होते. शहरात कोयेते उगारून दहशत माजविण्याच्या घटना, तसेच वाहनांची तोडफोड अशा प्रकारच्या घटनांमुळे पुणेकरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पुणे पोलिसांच्या कार्यक्षमेतवर नाराजी सुळे यांनी व्यक्त केली होती. सुळे यांनी गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न उपस्थित करुन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. विषारी दारू प्रकरणानंतर सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी केली होती. राष्ट्रीय गुन्हे सांख्यिकी संस्था (एनसीआरबी) गुन्हेगारीत पुण्यााचा क्रमांक पाचव्या स्थानावर आहे, अशी टीका केली होती.

सुळे यांच्या टीकेनंतर पोलीस आयुक्तांनी सुळे यांना पत्र पाठविले आहे. गेल्या दोन वर्षातील गुन्हेगारी घटना, गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण याबाबतची माहिती सुळे यांना पत्राद्वारे दिली. या पत्रात पोलीस आयुक्तांनी पुण्यातील गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा केला आहे. ‘ २०२५ च्या तुलनेत २०२६ मध्ये बहुतांश गंभीर गुन्ह्यांच्या घट झाली आहे. खुनाचा प्रयत्न, लूटमार, दागिने हिसकावणे, घरफोडी, वाहन चोरी, गंभीर दुखापत, बलात्कार, विनयभंग अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या चार महिन्यात घट झाली आहे.

मात्र, शहराता गेल्या दहा ते पंधरा दिवसांत गंभीर गु्न्ह्यांच्या घटना वाढल्या. त्यानंतर पोलिसांनी शहरात सरइतांची झाडाझडती (कोम्बिंग ऑपरेशन) घेतली. शहरातील वेगवेगळ्या भागात गस्त वाढविली. प्रतिबंधात्मक कारवाया करुन सराइतांना ताब्यात घेतले’, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सुळे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

‘शहरात टोळीयु्द्धातून गोळीबार झाला. पोलिसांनी त्वरीत या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या प्रयत्नांमुळे तरुणाचे प्राण वाचले. पोलिसांनी रात्रगस्त वाढवली आहे. जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करुन शहरातील घटनांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. चौकाचौकात पोलीस बंदोबस्तास नेमण्यात आले आहेत. पोलिसांच्या उपस्थितीमुळे गुन्हेगारी नियंत्रणात येईल’, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

पोलीस आयुक्तांचा दावा

‘गेल्या पाच महिन्यात खुनाचा प्रयत्न प्रकरणातील गुन्ह्यांमध्ये २७ टक्क्यांनी घट झाली आहे. सोनसाखळी चोरीत ५६ टक्के, तसेच लूटमारीच्या घटनांमध्ये ३६ टक्के घट झाली आहे. वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये ५० टक्के घट झाली आहे. मे महिन्यात पाच गंभीर गुन्हे घडले. त्यानंतर शहरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली, तसेच पोलिसांची गस्त वाढविण्यात आली’, असा दावा पोलीस आयुक्तांनी पत्राद्वारे केला आहे.