पुणे : माजी उपमुख्यमंत्री यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरदार सुरू होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाल्यानंतर यावरून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये वाद प्रतिवाद सुरू आहे. विलिनीकरणावरून दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या भूमिका मांडल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही विलिनीकरणावर भूमिका मांडली आहे. ‘माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझ्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याबाबत काय बोलणे झाले होते, हे आम्हा बहीण-भावाला माहीत आहे. माझा भाऊच गेला, मग कशाला खरे-खोटे करायचे? लोकांची कामे करणे, ही अजितदादांची ओळख होती. त्यामुळे लोकांची कामे करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल,’ अशी भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेऊन त्यावर चर्चा करण्यासाठी बुधवारी खासदार सुळे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत सुळे यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, ‘माझा भाऊ मोकळ्या मनाचा होता. माझा दादा गेला, ते दुःख आयुष्यभर राहील.’ विलीनीकरणाला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आडकाठी आणतात का? असा प्रश्न त्यांना विचारला असता, ‘राम कृष्ण हरी’ असे त्या म्हणाल्या.

आमदार रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, ‘अजितदादा रोहितचा काका होता, त्यामुळे त्याची अस्वस्थता सहाजिकच आहे. रोहित पवार दादांच्या अपघाती मृत्यूचा अभ्यासपूर्वक पाठपुरावा करत आहे. दादांचा घातपात वाटतो, म्हणूनच आम्ही पारदर्शक चौकशीची मागणी करत आहोत. दादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी होऊन सत्य बाहेर येण्याची प्रत्येकजण वाट पहात आहे. हा विषय राजकारणाचा नाही, तर आमच्या घरातील कर्ता माणूस गेला आहे, आम्ही दादाला पाहू शकलो नाही, त्यामुळे सत्य समोर येणे गरजेचे आहे.’

‘पीडितांना न्याय मिळाला पाहिजे’

भिगवणमधील घटनेबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, ‘पोलीस अधीक्षकांशी बोलणे झाले आहे. या घटनेतील पीडितांना न्याय मिळाला पाहिजे. तेथे शांतता राहिली पाहिजे. हा विषय वाढणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्रात एक नवा ट्रेंड सुरू झाला आहे. हिंसा होऊ नये,’ असे आमचे म्हणणे आहे.