पुणे : ‘उत्सवाच्या काळात ‘डीजे’ वापराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका तळ्यात-मळ्यात अशी आहे. ‘डीजे’बाबत त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावे, महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करावे,’ अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

उरळी देवाची – फुरसुंगी येथील कचरा डेपोसंदर्भात नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनाच्या मुद्द्यासह शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात खासदार सुळे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याबरोबर बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार सुळे म्हणाल्या, ‘डीजेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी केली पाहिजे. पण, ‘डीजे’ वापराबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका जिलबीसारखी गोल आहे. ठोस भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांनी राज्याला दिशा देण्याचे काम केले पाहिजे.’

फुरसुंगी येथील कचरा डेपोबाबत स्थानिक नागरिक आंदोलन करीत आहेत. या बाबत आयुक्त राम यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली असून, हा प्रश्न सोडविण्यासाठी आयुक्तांनी १५ दिवसांचा वेळ मागितला असल्याचे खासदार सुळे यांनी सांगितले. ‘कचरा डेपोचे काम चुकीच्या पद्धतीने होत आहे. ते काम योग्य पद्धतीने झाले पाहिजे,’ असे त्या म्हणाल्या.

‘आंदोलक, शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होतात; मग लोकांना फसविणारे आणि गंभीर गुन्हे करणारे का सापडत नाहीत ? भाजप सरकार सत्तेत आल्यापासून पेपरफुटीच्या घटना घडत आहेत. जगभर परीक्षा होतात, मात्र आपल्या जिल्ह्या-तालुक्यातच पेपर फुटतात. यास जबाबदार कोण आहे,’ असा प्रश्नही सुळे यांनी विचारला.

राज्यात सुरू असलेल्या फोडाफोडीचा राजकारणावर ही खासदार सुळे यांनी टीकास्त्र सोडले. शेतकरी, विद्यार्थी, महिला, नोकरदार अश्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वाढता महागाईने सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. नागरिकांना दिलासा देण्याऐवजी पक्ष फोडा, राजकारण करा यामध्येच सत्ताधारी पक्ष अडकले, असल्याची टीका देखील खासदार सुळे यांनी केली. प्रशासनाने ‘एसआयआर’ प्रक्रियेचे काम पारदर्शीपणे करावे. महिला आरक्षण व मतदारसंघ पुनर्रचना यांचा संबंध नाही. फलटण येथील आत्महत्येची स्वतः माहिती घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.