बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आलेल्या सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट दिली. अजित पवार यांच्या मातोश्रीची घेतलेली भेट ही राजकीय नाही. तर, आशा काकींचा आशीर्वाद घ्यायला आले होते, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला. बारामतीत कमी पडलो असल्याची कबुली देत अजित पवार यांनी विधानसभेची रणनीती आता आखली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या मातोश्रींची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा – पुणे : सदाशिव पेठेतील शैक्षणिक संस्थेत आग; वसतिगृह व्यवस्थापकाचा मृत्यू, ४० विद्यार्थिनी बचावल्या

हेही वाचा – धक्कादायक! कसब्यात घटस्फोटीत महिलेच्या दुसऱ्या पतीचा कोयत्याने वार करून खून; गुंड राजा मारटकरच्या मुलासह साथीदारावर गुन्हा

सलग चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आमदार रोहित पवार यांच्यासमवेत बारामती तालुक्यातील दुष्काळी दौरा केला. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. ‘नवी जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी मोठ्यांचे आशीर्वाद घेण्याचे संस्कार आपल्यावर झाले आहेत. त्यामुळेच आशा काकींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी घरी आले’, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.