पुणे : मुळशी तालुक्यातील भूगाव येथे राजेंद्र शेंडे यांच्या फार्म हाऊसमध्ये बिबट्याने घुसून एक शेळी ओढून नेल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, खासदार सुप्रिया सुळे यांनी वनविभागाला पत्र लिहून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
भूगाव आणि आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचे दर्शन वारंवार होत असल्याने स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी बिबट्या घरांच्या आसपास फिरत असल्याने ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेती आणि पशुपालनावर अवलंबून असलेल्या गावकऱ्यांना आपल्या जनावरांचे नुकसान होण्याची भीती आहे. यापूर्वीही या परिसरात बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत.
या घटनेची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी वन विभागाला पत्र लिहून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. तर, स्थानिक नागरिकांनी पिंजरे लावणे, गस्त वाढवणे आणि जागरूकता मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.
वन विभागाने या प्रकरणी तपास सुरू केला असून, लवकरच उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.