scorecardresearch

कलमाडी पुण्याच्या राजकारणात परतणार? अनेक वर्षांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी

भाजप नेत्यांबरोबर कलमाडींनी केला नाश्ता

कलमाडी पुण्याच्या राजकारणात परतणार? अनेक वर्षांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी
Ganesh visarjan 2017: कॉमनवेल्थ घोटाळा उघडकीस आल्यानंतर खासदार सुरेश कलमाडी यांना काँग्रेस पक्षातून निलंबित व्हावे लागले होते. त्यानंतर गेल्या चार वर्षांमध्ये सुरेश कलमाडी यांनी पुण्यातील सार्वजनिक कार्यक्रमांना फारशी हजेरी लावली नव्हती.

पुण्यातील गणेशोत्सव यंदा अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरला आहे. त्यानंतर मंगळवारी विसर्जन सोहळ्यातील राजकीय व्यक्तींच्या सहभाग अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. आज सकाळी पुण्यातील मानाचा पहिला गणपती असणाऱ्या श्री कसबा गणपती मंडळाच्या मिरवणुकीने या सोहळ्याची सुरूवात झाली. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक आणि काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी गणपतीला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर या सर्व राजकारण्यांनी एकत्र बसून नाश्ताही केला. एरवी पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर नाश्त्यासाठी एकत्र जमणारे राजकारणी ही पुणेकरांसाठी नवीन बाब नाही. मात्र, आज सुरेश कलमाडी यांनी अनेक वर्षांनंतर सार्वजनिक कार्यक्रमात घेतलेला सहभाग अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. त्यामुळे कलमाडी पुण्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

कॉमनवेल्थ घोटाळा उघडकीस आल्यानंतर खासदार सुरेश कलमाडी यांना काँग्रेस पक्षातून निलंबित व्हावे लागले होते. त्यानंतर गेल्या चार वर्षांमध्ये सुरेश कलमाडी यांनी पुण्यातील सार्वजनिक कार्यक्रमांना फारशी हजेरी लावली नव्हती. कलमाडींच्या निलंबनानंतर लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला होता. त्यानंतर पुण्यातील काँग्रेसच्या राजकारणाची सूत्रे पुन्हा कलमाडी यांच्याकडे सोपवण्यात येतील, अशी चर्चाही रंगली होती. परंतु, काही दिवसांपूर्वीच कलमाडी यांनी पुणे महापालिकेतील भाजपच्या कारभारावर समाधान व्यक्त केल्याने नव्या राजकीय चर्चांना उधाण आले. त्यानंतर आज त्यांनी थेट भाजप नेत्यांबरोबर गणपती विसर्जन मिरवणुकीला हजेरी लावली. त्यामुळे सुरेश कलमाडी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.

श्री कसबा गणपती मंडळाच्या मिरवणूक सोहळ्याला महापौर मुक्ता टिळक,पालकमंत्री गिरीश बापट,खासदार अनिल शिरोळे तसेच सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी कलमाडी यांनी कसबा गणपतीला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ही राजकीय मंडळी नाश्त्यासाठी एकत्र जमली. यावेळी कलमाडी आणि बापट एकाच टेबलावर बसले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी दोन्ही नेते एकमेकांशी फारसे बोलले नाहीत. मात्र, ही पुण्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीची नांदी असावी का, असा प्रश्न अनेकांच्या मनात उत्त्पन्न झाला. यावेळी सुरेश कलमाडी यांनी पुण्यातील राजकारणाविषयी काय वाटते, असा प्रश्नही विचारण्यात आला. मात्र, त्यावर काहीही बोलण्यास कलमाडी यांनी नकार दिला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-09-2017 at 13:15 IST

संबंधित बातम्या