पुणे : ‘देशात मोठे रस्ते बांधले जात असून, त्यासाठी वृक्ष-जंगलतोड, नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट केली जात आहे. मोठमोठ्या इमारती बांधून शहरीकरण वाढणाऱ्या विकासाच्या कल्पनेला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी छेद दिला. ‘केवळ रस्ते बांधणे, झाडे-जंगले तोडणे, मोठ्या इमारती बांधणे एवढाच विकास नसून, निसर्गसंपन्न वातावरणात सुदृढ आयुष्य जगणे हा खरा विकास आहे. मात्र, तसा विकास होताना दिसत नसून, नागरिक पाळण्यातल्या मुलाचे नाव ‘विकास’ ठेवून समाधान मानत आहेत,’ अशा परखड शब्दात भाजपला घरचा आहेर दिला.

दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतरावरून भाष्य करताना ‘सध्या पक्षांतराचे प्रमाण खूप वाढले असून, पक्षांतर करणारे केवळ स्वरक्षणासाठी येत आहेत. त्यांचे काम झाले की हे आगंतुक पाहुणे पुन्हा निघून जातात,’ असे मतही त्यांनी मांडले.

महाराष्ट्र विकास केंद्रातर्फे देण्यात येणारा यंदाचा जलमित्र पुरस्कार भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी डॉ. अजितकुमार पटनाईक यांना देण्यात आला. त्या वेळी डॉ. प्रभू बोलत होते. यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, गॅझेटिअर विभागाचे निवृत्त कार्यकारी संचालक डॉ. अरुणचंद्र पाठक, पुरस्कार समितीतील सदस्य सुनील जोशी, महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील उपस्थित होते.

डाॅ. प्रभू म्हणाले, ‘देशात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. हा मोठा व्यापक प्रश्न असून, त्यासाठी प्रामुख्याने जमिनींचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे. सर्व सरोवर, नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. निसर्ग टिकला, तरच जैवविविधता टिकेल. त्यासाठी चिल्हा सरोवराचे जिवंत उदाहरण आपल्यापुढे असून, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या पक्ष्यांचे स्थलांतर होत आहे. मात्र, राजकीय परिस्थिती पाहिली, तर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात मोठ्या प्रमाणावर प्रवेश होत आहेत. सध्या पक्षांतराचे प्रमाण खूप वाढले असून, पक्षांतर हे केवळ सत्तेसाठी नसून, केवळ हित साधण्यासाठी आहे. हे आगंतुक पाहुणे सत्तेसाठी न येता त्यांचे काम झाले, की निघून जातात.’

सध्याच्या बदलत्या नैसर्गिक परिस्थितीचा कानोसा घेतला, तर मानवी जीवन लवकरच संपेल, अशा परिस्थितीवर आपण उभे आहोत. त्यामुळे नैसर्गिक सृष्टी वाचविण्यासाठीची दृष्टी मिळणे आवश्यक असून, येत्या नवीन वर्षात निसर्ग कसा चांगला ठेवता येईल, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही डाॅ. प्रभू यांनी केले.

अखेर नवीन शैक्षणिक धोरणात बदल

शैक्षणिक क्षेत्रात पूर्वीच अभ्यासक्रमाचे धडे कमी करून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके आणि प्रत्यक्ष ठिकाणांवर नेऊन माहिती देण्यासाठीचे किमान धोरण ठरवले असते, तर आज वेगळी परिस्थिती पाहावयास मिळाली असती, अशी स्पष्टोक्ती माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी देत नवीन शैक्षणिक धोरणात दोन तास प्रात्यक्षिकांसाठी दिल्याच्या निर्णयाबाबत उल्लेख केला. तसेच जलस्रोतांच्या संवर्धनासाठी, पाण्याच्या सुनियोजित वापरासाठी येत्या काळात एक हजार ग्रामीण भागातील गावांमध्ये ‘यशदा’तर्फे ‘ब्रँडिंग’करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.