पुणे : डिजिटलायझेशनला घाबरून न जाता त्याचा फायदा करून घेणे, त्यावर स्वार होणे महत्त्वाचे आहे. वेगाने प्रगती करण्यासाठी डिजिटलायझेशन ही संधी आहे. डिजिटलायझेशनचा कॉर्पोरेट क्षेत्राकडून आक्रमकपणे वापर केला जातो. त्याप्रमाणे सहकारी संस्थांनीही डिजिटलायझेशनचा स्वीकार करून भविष्याच्या दृष्टीने गती देण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी मांडली. बदलत्या भू-राजकीय परिस्थितीत सहकारी संस्था देशाला महत्त्वपूर्ण उपाय उपलब्ध करून देऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतर्फे आयोजित ‘को-ऑपरेटिव्ह डिजिटल समिट’च्या समारोप सत्रात प्रभू दूरदृश्यप्रणालीद्वारे बोलत होते. गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. उमाकांत दाश या वेळी उपस्थित होते. प्रभू यांनी सहकार क्षेत्राचे महत्त्व, सहकारी संस्थांचे योगदान, डिजिटलायझेशनची गरज या अनुषंगाने भाष्य केले.
प्रभू म्हणाले, ‘सहकाराच्या माध्यमातून अनेक व्यक्ती एकत्र येऊन स्वत:सह समाजात परिवर्तन घडवू शकतात. सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकार क्षेत्राचे पुढील काही वर्षांचे धोरण निश्चित करण्याचे ठरवले. त्यासाठीच्या समितीमध्ये माझा समावेश केला. आम्ही सर्वसमावेशक पद्धतीने सहकाराच्या रचनेचा अभ्यास केला. त्यात डिजिटल क्षेत्राचाही समावेश होता. डिजिटल क्षेत्र भविष्याच्या दृष्टीने निश्चितच महत्त्वाचे आहे. एकल संस्थांना डिजिटलायझेशनचा खर्च कदाचित परवडणार नाही, आजचे तंत्रज्ञान उद्या महत्त्वाचे राहणार नाही अशा बाबी विचारात घेऊन या धोरणात संस्थांचा समूह करण्याचे प्रस्तावित केले.
आता हॅकिंग अत्यंत सोपे झाल्याने डिजिटल क्षेत्रात सुरक्षितता महत्त्वाची झाली आहे. त्यामुळे डिजिटलायझेशन करताना सहकारी संस्थांनी सुरक्षिततेच्या बाबतीत सातत्याने अद्ययावत राहिले पाहिजे. हॅकिंग रोखणारी यंत्रणा उपलब्ध केली पाहिजे.’ सारस्वत बँकेने ४० वर्षांपूर्वी संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी राष्ट्रीयीकृत, खासगी बँकांनीही संगणकीकरण केलेले नव्हते. त्यामुळे संस्थांनी भविष्याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी संस्थेत भविष्यवेधी नेतृत्व असणे आवश्यक आहे.
सहकारी संस्था केवळ बँकिंग नाही, तर सर्वच क्षेत्रांत आहेत. व्यवस्थापन प्रणालीवर गुणवत्ता अवलंबून असते. माहिती प्रणालीवर निर्णय अवलंबून असतात. त्यामुळे डिजिटलायझेशनचा योग्य पद्धतीने वापर केल्यास सहकारी संस्था कॉर्पोरेट कंपन्यांच्या एक पाऊल पुढे राहू शकतात. सहकारी संस्थांनी भविष्यासाठी सज्ज असले पाहिजे. आजच्या जागतिक परिस्थितीत प्रत्येक जण स्वत:पुरता विचार करत आहे. अशा वेळी सहकारी संस्थांना त्यांचा परिसर, माणसे माहीत असतात. त्यामुळे बदलत्या परिस्थितीत सहकारी संस्था महत्त्वाच्या आहेत, असेही प्रभू यांनी सांगितले.
