पुणे : ‘‘या टोपीखाली दडलंय काय?’ हे गीत पडद्यावर पाहताना सध्याच्या राजकारणातून टोप्या लुप्त झाल्या असल्याचे जाणवले. पूर्वी शिक्षण व साखरसम्राटांची दंडेली गाजत होती. मी ज्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतो तेथे लक्ष भोजन गाजले होते. समाजवादी भूमिकेतून त्या वेळी ‘तरुण तुर्क’मध्ये अग्रेसर असलेले मोहन धारिया गरिबांसाठी झगडत होते. त्या काळात ‘सामना’ चित्रपट आला, अशा शब्दांमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बदललेल्या राजकीय-सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले.
‘सामना’ चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ‘कोहिनूर कट्टा’ उपक्रमाचा शुभारंभ झाला. त्या प्रसंगी शिंदे बोलत होते. विजय तेंडुलकर, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू आणि भास्कर चंदावरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘वाळवी’ चित्रपटास प्रदान करण्यात आलेला साहित्य कला गौरव सामना सन्मान मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी शिंदे यांच्या हस्ते स्वीकारला. कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, आशय फिल्म क्लबचे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, साहित्य कला गौरवचे गौरव फुटाणे या वेळी उपस्थित होते. या निमित्ताने ‘सामना’चे निर्माते रामदास फुटाणे, ज्येष्ठ अभिनेते डाॅ. मोहन आगाशे आणि विलास रकटे यांच्याशी दिलीप ठाकूर यांनी साधलेल्या संवादातून आठवणींचा पट उलगडला.
‘हुल्लडबाज चित्रपटांच्या तुलनेत ध्येयवादी चित्रपटांना कमी प्रतिसाद मिळतो. परंतु, काळाच्या कसोटीवर टिकून राहणाऱ्या ध्येयवादी चित्रपटांच्या तुलनेत जे खपते ते विकणाऱ्याच्या मागे निर्माते उभे राहतात, ही खरी शोकांतिका आहे. ध्येयवादी चित्रपटांना आर्थिक पाठबळ देणे निर्मात्यांना व्यवहाराच्या पातळीवर धोक्याचे वाटते. नवसमाज निर्मितीच्या ऊर्मीने चित्रपटाची निर्मिती झाली पाहिजे,’ अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.
‘माझ्यासारख्या ग्रामीण भागाची पार्श्वभूमी लाभलेल्या व्यक्तीने थेट विजय तेंडुलकर यांच्याकडे धरलेला हट्ट, ग्रामीण महाराष्ट्राचे राजकारण समजून घेत त्यांनी लिहिलेल्या कथा-पटकथेतून ‘सामना’ची निर्मिती झाली. त्या वेळी सहकार क्षेत्रातील नेत्यांतून विरोध झाला, तरी बर्लिन चित्रपट महोत्सवात ‘सामना’ पाठविण्याची नर्गिस दत्त यांनी घेतलेली भूमिका आणि चित्रपटाला मिळालेल्या यशामध्ये केवळ तेंडुलकरांच्या दमदार लेखणीचा महत्त्वाचा वाटा आहे,’ असे फुटाणे यांनी मनोगतामध्ये सांगितले.
आगाशे म्हणाले, ‘सध्याचे राजकीय वातावरण पाहता सामना चित्रपटाचे कथानक आजही लागू आहे. तेंडुलकर यांची कथा, लागू- निळू यांचा अभिनय हे सामना चित्रपटाचे बलस्थान आहे.’ स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. गौरव फुटाणे यांनी आभार मानले.
विजय तेंडुलकर हे प्रवृत्तीचे लेखन करणारे आहेत. त्यामुळे सामना चित्रपटातील मारुती कांबळे अजूनही जिवंत आहे. तो विविध प्रसंगांमध्ये दररोज आपल्याला दिसतो. व्यक्तिरेखेला एकही संवाद नसलेल्या मोहन आगाशे यांना मूक चित्रपटाचा अभिनेता होण्याचे भाग्य या चित्रपटाने दिले.- रामदास फुटाणे, ‘सामना’ चित्रपटाचे निर्माते