पुणे : ‘भारतीय जनता पक्ष हा खरोखर पुरोगामी विचारसरणीचा असेल, तर त्यांनी २०२९ च्या लोकसभेत सत्तेवर आल्यास महिला पंतप्रधान आणि महाराष्ट्रात महिलेला मुख्यमंत्रीपद द्यावे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक सरसंघचालकपदीही महिला नियुक्त करावी. याला आमचाही पाठिंबा असेल,’ असे आव्हान शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिले.
केंद्रामध्ये महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांनी विरोध केल्यानंतर काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज सुषमा अंधारे यांनी या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या विविध मुद्द्यांचा समाचार घेतला.
मुख्यमंत्र्यांनी काल, ‘विरोधकांनी विधेयकाची भ्रूणहत्या केली,’ असा उल्लेख केला होता. त्यावर अंधारे यांनी आक्षेप घेतला. ‘सन १९५१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम हे विधेयक मांडले. याला जनसंघाचे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय यांनी विरोध केला. आपण महिलांना न्याय देऊ शकत नाही, या भावनेतून बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला. जर फडणवीस हे विधेयक विरोधकांमुळे मंजूर होऊ शकले नाही, असे म्हणत असतील, तर मुख्यमंत्री फडणवीस आपणही राजीनामा देणार का,’ असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
‘महात्मा फुले यांच्या पुस्तकांचे जाहीर वाचन संघाच्या कार्यक्रमात करणार का?’
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांचा उल्लेख करून विरोधकांवर टीका केली. त्यावर, ‘महात्मा जोतिबा फुले यांनी लिहिलेल्या ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या पुस्तकांचे जाहीर वाचन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक कार्यक्रमात करणार का,’ असे आव्हान सुषमा अंधारे यांनी या वेळी सत्ताधाऱ्यांना दिले. या विधेयकाला खासदार प्रणिती शिंदे, सुप्रिया सुळे यांनी विरोध केल्यानंतरही फडणवीस यांनी पवार साहेबांनी बोलायला पाहिजे, असा उल्लेख केला होता. त्यावरही, ‘मुख्यमंत्री, तुम्ही महिलांना शूद्र लेखता का आणि स्वतःला उच्च समजता का,’ असा खोचक सवाल करून, ‘मुख्यमंत्र्यांनी सत्याला सामोरे जाऊन चर्चा करावी,’ असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले.
अंधारे यांनी २० आणि २१ सप्टेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महिला आरक्षण विधेयक संमत झाल्याचे ट्विटही त्यांनी या वेळी पत्रकार परिषदेत दाखवले. ‘महिलांना आरक्षण द्यायचेच असेल तर ५४३ मधून द्या,’ अशीही मागणी त्यांनी केली.
‘जनगणनेनंतर लोकसभेत लोकसंख्येनुसार खासदारांची संख्या वाढणार असल्याचे सांगितले जात असले, तरी दक्षिणेतल्या खासदारांची संख्या आहे तेवढीच राहणार; उत्तरेतील मात्र ती वाढणार असून दक्षिण आणि उत्तरेतील हा वाद निर्माण करण्याची भारतीय जनता पक्षाला गरजच काय होती,’ असाही प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला.
‘अनेक मोठी नावे बाहेर येऊ शकतात’
‘भोंदू अशोक खरात याची मालमत्ता १५ हजार कोटी असल्याचे बोलले जात असून, याची सखोल चौकशी करावी; तसेच खरात याची सुरक्षितता वाढावी; कारण अनेक मोठी नावे यातून बाहेर येऊ शकतात,’ अशी मागणी सुषमा अंधारे यांनी या वेळी पत्रकार परिषदेत केली.
