पुणे : ‘लाडकी बहीण’ योजनेतून आता ९२ लाख महिला वगळण्यात आल्या आहेत. योजनेसाठी एकूण मंजूर खर्च २९ हजार ६९३ कोटी रुपये होता. मात्र, प्रत्यक्षात दाखविण्यात आलेला खर्च ३३ हजार २३७ कोटी रुपये असून, हा अतिरिक्त ३ हजार ५४१ कोटी रुपयांचा निधी आला कुठून, लाडक्या बहिणी दोडक्या कशा झाल्या,’ असा सवाल शिवसेना (ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. हा निधी ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’ किंवा सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदींमधून वळवण्यात आला का, याचे उत्तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले पाहिजे, अशी मागणीही अंधारे यांनी केली.

त्या म्हणाल्या, ‘या सगळ्याबाबत नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाने (कॅग) महाराष्ट्र सरकारला स्पष्टीकरण मागितले आहे. अदिती तटकरे यांनी निधी तिकडेच का वळवला? पायाभूत सुविधांचा विचार केला नाही. पायाभूत सुविधांकडे लक्ष दिले असते, तर मोशी, चाकणमधील घटना घडल्या नसत्या. पैसे आमचे असताना टिमक्या तुमच्या वाजत आहेत. जेव्हा ही योजना आली, तेव्हा महिलांची त्या काळात तपासणी का केली नाही? जी तूट आहे, याबाबत अदिती तटकरे यांनी उत्तर द्यायला हवे.’

‘‘लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी महिलांची संख्या सुरुवातीला सव्वादोन कोटी होती. निवडणुका पार पडताच निकषांकडे बोट दाखवून महिलांना अपात्र ठरवणे सुरू झाले. पहिल्या टप्प्यात ७० लाख, दुसऱ्या टप्प्यात १२ लाख आणि तिसऱ्या टप्प्यात १० लाख अशा एकूण ९२ लाख महिला योजनेतून वगळण्यात आल्या. आता पगारी मतदारांची गरज उरली नाही म्हटल्यावर हळूहळू निकष दाखवून या योजनेत कपात केली गेली. एका महिलेचे वर्षाचे १८ हजार रुपये हिशेब धरल्यास ९२ लाख महिलांना वगळून सरकारने तब्बल १ लाख ६५ हजार ६०० कोटी रुपयांची कपात केली. महाराष्ट्राच्या जनतेचा हा पैसा कुठे गेला,’ असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.

आयुक्त बेजबाबदारपणे वागले आहेत

‘मोशी दुर्घटना प्रकरणात विधिमंडळाचे अधिवेशन संपेपर्यंत मृतांचा नेमका आकडा येऊ दिला गेला नाही. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी, प्रकल्प अधिकारी आणि कंपनीचे गूळपीठ आहे का? या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सर्वांना निलंबित करायला हवे,’ सुषमा अंधारे म्हणाल्या.