पुणे : पत्नी माहेरी निघून आल्याने जावयाने सासूरवाडीतील घर जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना कोथरुडमधील सुतारदरा परिसरात घडली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी साहिल हनुमंत हाळंदे (वय २५, रा. भूगाव, ता. मुळशी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत हाळंदेच्या सासूने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल आणि त्याची पत्नी तेजल यांच्यात वाद झाल्याने ती बुधवारी रात्री कोथरूड भागातील माहेरी निघून आली होती. त्यानंतर तिच्या पाठाेपाठ साहिल सुतारदरा परिसरातील सासूरवाडीत आला. ‘तू लगेच घरी आली नाही, तर तुझ्या आईचे घर जाळून टाकील’, अशी धमकी त्याने पत्नीला दिली. त्यानंतर साहिल सासूच्या घरात शिरला. शिवीगाळ करुन त्याने ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली. आगीत घरातील साहित्य जळाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा…व्यायाम शाळेतून घरी येताच संगणक अभियंत्याचा मृत्यू; कुस्तीगिराच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी घटना

पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या हाळंदेचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sutardara area of kothrud where son in law tried to burn house of in laws after his wife left her mothers house pune print news rbk 25 sud 02