पुणे : रखडलेला ‘लिंक रोड’, पदपथ-रस्त्यांवर पडलेले कचऱ्याचे ढीग आणि पायाभूत सुविधांअभावी सुतारवाडी परिसरातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहराच्या विकास आराखड्यात समावेश करण्यात आलेला ‘ब्ल्यू बेल्स ऑरा’ ते ‘साई एनक्लेव्ह’ हा सुतारवाडी लिंक रोड गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. या रस्त्यामुळे पाषाण, सुतारवाडी आणि बाणेरकडे जाणाऱ्या वाहतुकीवरील ताण कमी होणे अपेक्षित होते. मात्र, या रस्त्याचे काम अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही. त्यात पर्यायी मार्ग नसल्याने परिसरातील शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी, रोजच्या कामांसाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फेरा मारावा लागतो. त्यात खड्डे आणि चिखलामुळे अपघातांचे प्रमाणही वाढल्याचे निरीक्षण परिसरातील रहिवासी नोंदवतात.

खड्ड्यांमुळे सुतारवाडीतील अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यावरून शेकडो शालेय मुले ये-जा करतात. तसेच, रुग्णवाहिका आणि रोजच्या कामांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांची तातडीने देखभाल-दुरुस्ती करावी. तसेच, या कामांसाठी जबाबदार अधिकाऱ्यांचे नाव आणि संपर्क क्रमांक फलकांवर लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, सुतारवाडी अंतर्गत रस्त्यालगत वाहणाऱ्या नाल्यावर बसवलेली संरक्षक जाळी अनेक ठिकाणी तुटली आहे. त्यामुळे येणारी-जाणारी वाहने नाल्यात घसरण्याची शक्यता वाढून वाहतूक सुरक्षा धोक्यात आली आहे. याच ठिकाणी तुटलेल्या जाळीतून अनेक बेजबाबदार नागरिक नाल्यात कचरा टाकतात. त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळे पावसाळ्यात हा कचरा तुंबण्याची भीतीही परिसरातील व्यक्त केली जाते.

tushar.suryawanshi@expressindia.com

कचऱ्याचे ढीग

पाषाण सुतारवाडीतील घनकचरा संकलन केंद्राची जागा वारंवार बदलल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आधी बस डेपोजवळ, नंतर कपिल आश्रम रस्ता आणि आता मारुती महादू सुतार विद्यालयाशेजारील नाल्यालगत कचरा संकलित केला जातो. यातील कचरा थेट नाल्यात वाहून जातो. त्यामुळे जलप्रदूषण वाढते. परिसरात दुर्गंधी पसरते.

सुतार विद्यालयाच्या लगतच जमलेल्या कचऱ्याच्या ढिगामुळे रहिवाशांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. कचरा गोळा करणाऱ्या गाड्या रस्त्यावरच उभ्या राहत असल्याने आधीच अरुंद असलेले रस्ते आक्रसत आहेत. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने सर्वेक्षण करून कायमस्वरूपी कचरा संकलन केंद्र उभारण्यात यावे. तसेच, रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी आहे.

नागरी प्रश्नांविषयी महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे अनेकदा तक्रार केली आहे. मात्र, दखल घेतली जात नाही. रस्ता, कचरा आणि पायाभूत सुविधांअभावी परिसरात वाहतूक, आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. -तन्मय केळकर पाषाण-सुतारवाडीतील नागरिकांचे प्रतिनिधी

खड्डे बुजवण्याबरोबर या संपूर्ण रस्त्याच्या दुरस्तीचे काम लवकरच करण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नाल्यांवरील संरक्षक जाळ्यांचीही देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे. कचऱ्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न करण्यात येत आहेत. नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, यासाठी पत्रे लावण्यात येणार आहेत. – विजय नायकल सहायक आयुक्त, औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालय

तुम्हीही पाठवू शकता अनुभव

दररोजच्या जीवनात तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या, प्रश्न, प्रशासनाकडून अपेक्षा याबाबत तुमचे अनुभव ‘लोकसत्ता’कडे पाठवू शकता. यामध्ये आवश्यक असलेल्या उपाययोजनादेखील नागरिक सुचवू शकतात. यातील महत्त्वाच्या पत्रांची दखल घेऊन त्याला ‘लोकसत्ता’च्या तगादा सदरामध्ये प्रसिद्धी दिली जाईल.
ई-मेल आयडी : lokpune4@gmail.com