पुणे : मुक्त प्रवेश करणाऱ्या रिक्षा, खासगी वाहने, सीमाभींतीना जोडण्यात आलेले तात्पुरते पत्रे, कोपऱ्यांमध्ये पडलेल्या दारूच्या बाटल्या, उघड्यावर कचऱ्याचे ढीग अशा समस्या स्वारगेट बस स्थानकावर अद्याप कायम आहेत.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्वारगेट बस स्थानकातील बसमध्ये एका महिलेवर अत्याचार घडल्याच्या घटनेला उद्या (२६ फेब्रुवारी) एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानंतरही स्थानकावरील काही गोष्टी अद्याप सुधारणेच्या प्रतीक्षेत आहेत.

स्थानकाच्या आवारात वर्षभरापूर्वी घडलेल्या गंभीर घटनेनंतर स्वारगेट पोलिसांच्या दिवसभरात आवारात फेऱ्या होतात. सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे. मात्र, बरेचदा खासगी वाहने, रिक्षा आणि कारचालक आवारात प्रवेश करून प्रवाशांना, बसना अडथळा निर्माण करतात. सुरक्षारक्षकांनी रिक्षाचालकांना, खासगी वाहनधारकांना प्रवेशद्वारावर अडवले, अथवा कारवाई केली, तर त्यांना दमदाटी करण्याचे प्रकार होत आहेत. याबाबत आगार प्रमुख आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रारी करण्यात आल्या असल्याचे एका सुरक्षारक्षकाने सांगितले.

स्थानकातील काही पायाभूत सुविधांचीही दुरवस्था झाल्याचे दिसते. सोलापूर, कोल्हापूर मार्गावरील बससाठी उभारण्यात आलेले फलाट मोडकळीस आले असल्याचे दिसते. फलाटाच्या खांबांना तडे गेले असून, काही खांब मधोमध तुटले आहेत.स्वारगेट हे एसटी महामंडळाचे शहरातील मध्यवर्ती बस स्थानक आहे. या भागात वाहनांची सतत वर्दळ असते. त्यातच नव्याने मेट्रो स्थानक झाले असून, जवळ मालवाहतूक (पार्सल) विभाग आहे.

स्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर लोखंडी फाटक नसल्याने खासगी वाहने, खाद्यपदार्थ विक्रेते, पथारीवाल्यांकडून स्थानक हद्दीत प्रवेश केला जातो. ते सुरक्षारक्षकांना न जुमानता आत शिरत असल्याचे निदर्शनास येते.स्थानकाच्या काही कोपऱ्यांत दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास पडल्याचे दिसून येते. काही ठिकाणी सुरक्षा भिंती तुटल्यामुळे पत्रे लावून मार्ग बंद करण्यात आले आहेत. मात्र, हे पत्रेही मोडकळीस आले असून, तेथून प्रवेश करण्यासाठी मार्ग करण्यात आल्याचे दिसते.

गेल्या वर्षभरातील सुधारणा

  • कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित ४० सीसीटीव्ही कॅमेरे
  • सुरक्षिततेसाठी ३ महिला आणि २१ पुरुष, असे एकूण २४ सुरक्षारक्षक
  • सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीन पाळ्यांमध्ये २४ तास गस्त
  • स्वतंत्र पोलीस चौकी

स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षात्मक उपाययोजनांमुळे चोरी, लूटमार किंवा इतर अनुचित घटना कमी झाल्या आहेत. प्रवाशांना सुरक्षिततेसाठी स्वतंत्र पोलीस शिपायाची नेमणूक आणि गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवाशांना सुरक्षिततेसंदर्भात तक्रार असल्यास तातडीने ११२ या क्रमांकावर संपर्क करावा. पाच ते सात मिनिटांमध्ये मदत उपलब्ध करून दिली जाते.

  • मिलिंद मोहिते

पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन, पुणे

स्वारगेट बस स्थानकाच्या सुरक्षेसाठी सुसज्ज यंत्रणा आणि सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. सुरक्षिततेसाठी यंत्रणा पूर्णपणे २४ तास कार्यरत आहे. मात्र, काही रिक्षाचालक, खासगी वाहनचालकांकडून सुरक्षारक्षकांना दमदाटी, धमक्या देण्याचे प्रकार होत आहेत. याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या आहेत.

  • प्रमोद धायतोंडे

आगार व्यवस्थापक (कनिष्ठ), स्वारगेट बस स्थानक