पुणे : स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गिकेचे विस्तारीकरण खेड-शिवापूर टोलनाका परिसरातून प्रस्तावित रिंगरोड पर्यंत करण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने शुक्रवारी मान्यता दिली. त्यानुसार हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी मुख्य सभेपुढे पाठविण्यात आला आहे.
शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गिकेचा विस्तार कात्रज पर्यंत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात मेट्रो भवन प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोचे दोनशे किलोमीटर लांबीचे जाळे येत्या काही दिवसांत उभारण्यात येणार असून त्यादृष्टीने नियोजन सुरू झाल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गिकेचे विस्तारीकरण खेडशिवापूर आणि परिसरातील रिंगरोड पर्यंत करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्याला शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
‘दक्षिण पुणे, कात्रज परिसर तसेच शिवापूर टोलनाका आणि प्रस्तावित रिंगरोडलगत झपाट्याने वाढणारे नागरिकरण आणि त्यातून वाढता वाहतूक ताण लक्षात घेता मेट्रो विस्तार अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे, असे शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षा स्मिता वस्ते यांनी सांगितले.
प्रस्तावित रिंगरोडशी मेट्रोचे प्रभावी कनेक्टिव्हिटी निर्माण झाल्यास शहरातील वाहतूक वितरण अधिक संतुलित होईल आणि भविष्यातील शहरी नियोजनाला मोठी चालना मिळेल, असा दावाही वस्ते यांनी केला.
या विस्तारामुळे कात्रजच्या पुढील भाग, शिवापूर टोलनाका परिसर तसेच रिंगरोडलगतच्या विकसित होत असलेल्या भागांना मोठा फायदा होणार असून खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून शहर सुधारणा समितीने सदर प्रस्तावास मंजुरी देऊन अंतिम मान्यतेसाठी तो मुख्य सभेकडे शिफारस केला आहे,अशी माहिती समितीकडून देण्यात आली.
