पुणे : स्वारगेट एसटी स्थानकात प्रवासी तरुणीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरुद्ध दोषारोप निश्चित करण्यात आले. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सोमवारी ८७ साक्षीदार, तसेच आरोपीच्या विरोधातील पुराव्यांची यादी न्यायालयात सादर केली. स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर २५ फेब्रुवारी २०२५ रोजी बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती.

बलात्कार प्रकणात पसार झालेला आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, ता. शिरुर, जि. पुणे) याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. गाडे हा उसाच्या शेतात लपून बसला होता. या प्रकरणात पोलिसांनी ५२ दिवसांत आरोपीविरुद्ध न्यायालयात ८९२ पानी आरोपपत्र दाखल केले होते. तपासात ८२ जणांची चौकशी करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा केले होते. तांत्रिक तपास, परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यात आले.

पोलिसांनी या प्रकरणात १२ पंचनामे करण्यात आले. या खटल्यात विशेष सरकारी वकील अजय मिसर हे काम पाहत आहेत. पीडीत तरुणीच्या वतीने ॲड. श्रीया आवले काम पाहत आहेत. या खटल्याची पुढील सुनावणी १५ जून रोजी होणार आहे. बलात्कार प्रकरणात गाडे याने न्यायालायत दोनदा जामीन अर्ज सादर केला होता. न्यायालायने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. गाडे याला येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

नसरापूर अत्याचार प्रकरणात, बालिकेच्या आजीची साक्ष

नसरापूर अत्याचार प्रकरणात पीडित बालिकेच्या आजीची सोमवारी विशेष न्यायालयात साक्ष नोंदविण्यात आली. अत्याचार प्रकरणात आतापर्यंत १३ जणांची साक्ष नोंदविण्यात आली आहे.

नसरापूर अत्याचार प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात सुरू झाली आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याच्याविरुद्ध आरोपनिश्चित करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी जलदगतीने तपास करून आरोपीविरुद्ध गुन्हा घडल्यानंतर १४ दिवसांत आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षाकडून ८२ साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर करण्यात आली आहे.

या खटल्यातील महत्त्वाच्या १३ साक्षीदारांची साक्ष विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी नोदविली. बचाव पक्षाकडून ॲड. हिंमतराव जाधव यांनी उलटतपासणी घेतली. या खटल्यात पीडित मुलीचे आई-वडील, मृत्यू प्रकरणात पंचनामा करणारे पंच, आरोपीला बालिकेसोबत पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींची साक्ष नोंदविण्यात आली आहे.