पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला घेऊन पुणे पोलिसांचे पथक शुक्रवारी शिरूर तालुक्यातील गुनाट गावात पोहोचले. एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर बलात्कार करून पसार झालेला गाडे तीन दिवस गुनाट गावातील उसाच्या फडात लपला होता.
गाडेने त्याचा मोबाइल संच उसाच्या फडात फेकून दिल्याचा संशय असून, पोलिसांनी मोबाइल संच शोधण्यासाठी शोधमोहीम राबविली. गाडे पसार झाल्यानंतर त्याला कोणी मदत केली, तसेच तो कोणाकडे पाणी पिण्यासाठी गेला. अशा सात जणांचे जबाब पोलिसांनी नोंदविले. स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात २५ फेब्रुवारी रोजी सकाळी सहाच्या सुमारास एसटीत वाहक असल्याची बतावणी करून गाडेने प्रवासी तरुणीवर बलात्कार केला होता. प्रवासी तरुणीने बसमध्ये प्रवास केल्यानंतर त्याने दरवाजा लावून घेतला. त्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर दोनदा बलात्कार केला होता.
गाडे शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी आहे. गुन्हा केल्यानंतर तो पसार झाला. पुणे पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. गाडे तीन दिवस गुनाट गावातील उसाच्या फडात लपला होता. पोलिसांनी त्याला गावातून अटक केली. गाडेला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथकाकडे सोपविला आहे. खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे तपास करत आहेत.
शुक्रवारी सकाळी सहा अधिकारी आणि ३० पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक गाडेला घेऊन गुनाट गावात पोहोचले. गाडेने उसाच्या फडात मोबाइल संच फेकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मोबाइल शोधण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम राबविली. मात्र, मोबाइल सापडला नाही.
पडक्या घरात वास्तव्य
गाडे पसार झाल्यानंतर गुनाट गावात आला. एका शेतातील पडक्या घरात त्याने वास्तव्य केले होते. त्याला एकाने जेवण दिले होते, तसेच एकाने पाणी पिण्यास दिले होते. पोलिसांचे पथक गाडेला घेऊन शुक्रवारी गावात पोहोचले. गाडे ज्या शेतात लपला होता. तो परिसर १०० एकरांचा आहे.